पतीच्या मृत्यूनंतर माझे एक दोन नाही तर ८० विवाहित पुरुषांशी संबध होते आणि मला याचा अभिमान आहे असा धक्कादायक खुलासा एका डॉक्टरच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीनं केला आहे. लुईस वेल्दे असं या महिलेचं नाव असून व्यवसायानं ती सेक्स थेरपिस्ट आहे. वैवाहिक नात्यात शारीरिक सुखाची कमतरता निर्माण झाली की नातं संपुष्टात येतं मग अशा वेळी पुरुष विवाहबाह्य संबध ठेवतात असंही ती म्हणाली.
लुईस वेल्दे ४३ वर्षांची आहे. ती समुपदेशक आहे. विवाहित जोडपे आणि प्रेमी युगुलांना ती ‘सेक्स’ या विषयावर मार्गदर्शन करते. नुकतीच तिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली यात तिनं विवाहबाह्य संबंधांवर खुलेपणानं भाष्य केलं. वैवाहिक जीवनात शारीरिक सुखाची कमतरता भासू लागली की नात्यात कटुता येऊ लागते. मग अशावेळी आपल्या जोडीदाराला फसवण्याचे प्रकार घडतात असंही ती म्हणाली. याच मुलाखतीत आपले एक दोन नाही तर ८० पुरुषांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा धक्कादायक खुलासाही तिनं केला.
२००४ मध्ये तिच्या पतीचं वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आधीपासूनच कटुता होती, म्हणूनच घटस्फोटाच्या आधीच आपण विवाहबाह्य संबंध ठेवायला सुरूवात केली असल्याचं तिनं म्हटलं आहे. आपले ज्या विवाहित पुरुषांशी संबंध आले, त्यांच्या पत्नींनादेखील ही बाब माहिती असल्याचंही तिनं मान्य केलं. ‘काहीवेळा नात्यातलं प्रेम हरवल्यानं पती पत्नी एकमेकांपासून विभक्त होतात. काहीवेळा तर ते जोडीदाराची फसवणूक करतात किंवा हे शक्य नसल्यास नात्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आपल्या मुलांवरच लक्ष केंद्रीत करतात.’ असंही निरिक्षण तिने नोंदवलं आहे.
६० % लोक शारीरिक सुखासाठी आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात. पण त्यांनी जर खुलेपणानं सेक्स या विषयावर चर्चा केली, हा विषय समजून घेतला तर नात्यात भांडणं कमी होतील असंही ती म्हणाली.