कुठल्याही मोठया शस्त्रक्रियेआधी डॉक्टर रुग्णाला भूल देऊन बेशुद्ध करतात. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात. गेल्या अनेक वर्षांपासून शस्त्रक्रियेची हीच पद्धत आहे. पण ग्वालेरच्या एका खासगी रुग्णालयात एक मोठी शस्त्रक्रिया सुरु असताना बिलकुल याउलट घडलं.

नऊ वर्षाच्या मुलीवर मेंदूची शस्त्रक्रिया सुरु असताना, ती चक्क जागी होती. डॉक्टर या मुलीवर मेंदूची शस्त्रक्रिया करत होते. त्यावेळी ती देशभक्तीपर गाणी म्हणत होती. तिच्या हाताची बोटे पियानोच्या किबोर्डवर फिरत होती. ऐकायला थोडं हे विचित्र वाटेल. पण ग्वालेरच्या खासगी रुग्णालयात या मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, “ही देशातील पहिली लहान मुलगी आहे, जिच्यावर ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ या आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली.”

डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेद्वारे मुलीच्या डोक्यातून ट्यूमर काढला. अशा पद्धतीने शस्त्रक्रिया करताना थोडीशी जरी चूक झाली, तर रुग्णावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असे डॉक्टरांनी सांगितले. “‘अवेक क्रॅनियोटॉमी’ पद्धतीने शस्त्रक्रिया करताना सर्जिकलच्या जोडीने भूल देण्याचही कौशल्य लागतं. त्याशिवाय रुग्णाकडूनही सहकार्य आवश्यक असतं” असे डॉक्टर अभिषेक चौहान यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

“रुग्ण शुद्धीत असल्यामुळे थोडीशी जरी चूक झाली तरी लगेच लक्षात येते आणि आम्ही आवश्यक ते बदल करु शकतो” असे डॉ. चौहान यांनी सांगितले. मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात राहणाऱ्या या मुलीला मागच्या दोन वर्षांपासून फिट येण्याचा त्रास होता. २०१९ मध्ये सीटी स्कॅन तपासणीत तिच्या मेंदूजवळ ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले.

“अशा केसेसमध्ये शस्त्रक्रिया शेवटचा पर्याय असतो. डॉक्टरांनी तिला वेगवेगळी औषध देऊन पाहिली. पण फिटचा त्रास सुरुच होता. एमआयआर स्कॅनमध्ये ट्यूमरचा आकार वाढल्याचे दिसले. त्यामुळे अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला” असे डॉक्टरांनी सांगितले. आठ डिसेंबरला डॉ. अभिषेक चौहान यांच्या देखरेखीखाली त्यांच्या तज्ज्ञ टीमने यशस्वीपणे शस्त्रक्रिया करुन या मुलीच्या डोक्यातून ट्यूमर काढला.