Malikkarjun Kharge Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.” असं खरगे यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून तुफान व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसंडोने यासंदर्भात केलेल्या तपासात या व्हिडीओचा मूळ संबंध भाजपाशी असल्याचे लक्षात आले आहे. नेमकं हे प्रकरण काय? खरगे खरंच असं म्हणाले का आणि जर असेल तर त्यामागचा नेमका हेतू काय होता हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल व्हिडीओमध्ये खरगे भाषणादरम्यान म्हणतात की, “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.” “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसवर अंतिम संस्कार होणार हे निश्चित केले आहे.” असे कॅप्शन देत लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

तपास:

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आमच्या लक्षात आले की, मल्लिकार्जुन खरगेंनी ३ मे रोजी गुजरातमधील अहमदाबाद शहरात केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. काँग्रसच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

वरील भाषणात मल्लिकार्जुन खरगे १२.०३ मिनिटापासून पुढे म्हणतात की, “अहमदाबाद हे एक प्रसिद्ध शहर आहे. या भूमीवर महात्मा गांधीजी, सरदार पटेलजी आणि इतर महान नेत्यांचाही जन्म झाला आणि त्यांनी गुजरातला महान बनवले. गांधीजी, सरदार पटेल, मुराभाई देशाई, बिठ्ठलभाई पटेल आणि सर्व महान नेत्यांनी देशाची उभारणी केली. त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचे तीन अध्यक्ष झाले, ज्यामध्ये सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जी.यू.एन देबर यांचे नाव आहे. या सगळ्यांनी पक्ष मजबूत केला.”

तसेच ते पुढे सांगतात की, “काँग्रेसचा पाया अहमदाबाद शहरात खूप मजबूत आहे. जो कोणी नष्ट करून शकत नाही आणि कोणीही पक्षाला संपण्याची हिम्मत करू शकत नाही. येथील काही नेते बोलतात की, ‘काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.’ अहमदाबाद हे शहर गांधींचे पवित्र शहर आहे. परंतु, आश्चर्याची बाब अशी आहे की, या भूमीवर अशा ही विचारधारेचे लोक जन्माला आले आहेत, जे गांधींची विचारधारा संपवू इच्छितात. या भूमीवर गांधींनी स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व दिलं, त्यांच्याच विचारांना संपवण्याचा विचार भाजपामध्ये केला जातो.”

सदरील वक्तव्य येथे पाहू शकता.

तसेच काँग्रसच्या अधिकृत वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण लिखित स्वरूप उपलब्ध आहे.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.

हे ही वाचा<< “मोदी जिवंत आहे..”, भरसभेत मोदींचा इशारा पण खुर्च्या रिकाम्याच? रोहित पवारांनी शेअर केलेल्या Video चा गैरप्रसार सुरु

निष्कर्ष: यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे. मुळात मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचा अंत पाहू इच्छिणाऱ्या लोकांवर आणि भाजपावर टिका करत होते. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अनुवाद: अंकिता देशकर

(ही कथा मूळतः फॅक्ट क्रेसेंडोने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)