देशामध्ये दिवसोंदिवस करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये १ मे पासून थोडी शिथिलता देण्यात आली आहे. असं असतानाच करोनासंदर्भातील भीती मनात असल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटायझरचे बूथ उभारण्यात आले आहेत. अनेक संस्था, पार्किंगच्या इमारती तसेच पेट्रोल पंपांबरोबरच टोलनाक्यांवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या सॅनिटाइज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र सॅनिटायझरचा विपरित परिणाम होऊ शकतो याची अनेकांना कल्पना नसते. असाच एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन झाल्यानंतर एक बाईकस्वार पुढे निघाला. मात्र पेट्रोल पंपावरुन बाहेर जातानाच गाडी सॅनिटाइज करण्यासाठी थांबला. पंपातून बाहेर पडण्याच्या मार्गावर थांबून दोन कर्मचारी या व्यक्तीच्या दुचाकीवर सॅनिटायझरचे फवारे मारत होते. गाडी पुढे जाण्यासाठी सुरु करताच गाडीने पेट घेतला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. गाडीचा चालक भीतीने गाडी तेथेच टाकून पळाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटींगविशरच्या मादतीने आग विझवली. हा सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

आग का लागली असावी?

गाडी सुरु असतानाच ती सॅनिटाइज केली जात असल्यामुळे तीचे इंजिन सुरु होते. त्यातच गाडी सुरु असल्यावर सायलेन्सरपासून ते इतक काही भाग चांगलेच गरम होतात. अशाचत त्यावर अल्कोहोलचे प्रमाण असणारे सॅनिटायझर पडल्याने गाडीने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सॅनियाटजरमध्ये आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा इथेनॉलचे प्रमाण अधिक असते. गरम वस्तूवर पडल्यावर ते पेट घेते. त्यामुळे पेट्रोल पंपावर गाडी सॅनिटाइज करताना काळजी घेणे गरजेचे असते.