मुंबई शहरावर आतापर्यंत अनेक संकट आली. कधी अतिरेक्यांचे हल्ले तर कधी नैसर्गिक आपत्ती…पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून मुंबईत अपघात होणं ही तर नित्याची बाब झालेली आहे. मात्र या सर्व गोष्टींवर मात करुन काही मुंबईकर शहराच्या भल्यासाठी झटत असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत यादरम्यान चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागांत झाडं पडली तर काही भागांत भूस्खलनाचे प्रकारही घडले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मुंबईच्या माटुंगा परिसरातील तुळसी पाईप रोडवर एक महिला भर पावसात मॅनहोल शेजारी उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊ नये म्हणून त्यांना मार्ग दाखवत होती.

कांता मारुती कलन असं या महिलेचं नाव असून ती माटुंगा स्थानकाबाहेरील फुटपाथवरील झोपडपट्टीत राहते. कांता यांचा फुलांची विक्री करण्याचा धंदा आहे. ३ ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखळ भागात पाणी साचलं होतं. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाईप लाईन भागात पाणी साचायला लागलं. महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा होण्यासाठी येत नसल्याचं पाहून कांता यांनी एका बाईकस्वाराच्या मदतीने रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण उघडलं आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वेगळी वाट करुन दिली. मॅनहोलचे झाकण उघडल्यानंतर वाहनचालकांचा अपघात होईल हे त्यांना लक्षात आल्यानंतर कांतता सहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत तिकडेच उभं राहत वाहनांना सुरक्षित वाट दाखवत होत्या. मुंबई मिरर वृत्तपत्राने कांता यांच्याशी संवाद साधत त्या दिवसाबद्दल जाणून घेतलं.

या पावसात कांता यांचा अख्खा संसार वाहून गेला. घरी परतल्यानंतर मुलांच्या ऑनलाइन क्लाससाठी जमवलेले १० हजार रुपयेही वाहून गेल्याचं कळलं. इतकच नव्हे तर पावसाचा जोर ओसरल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन कांता यांना जाब विचारला. तुम्हाला मॅनहोलचं झाकण उघडायला कोणी सांगितलं होतं?? असा सवाल महापालिका अधिकाऱ्यांनी विचारल्याचं कांता यांनी सांगितलं. पण परिसरात पाण्याची पातळी वाढत असल्याचं पाहून मला हा निर्णय घ्यावा लागल्याचं कांता यांनी सांगितलं. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांता यांचं कौतुक होतंय. परंतू कांता यांना आपल्या संसाराची काळजी असून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.