मध्य प्रदेशमधील चहावाल्याच्या मुलीनं गरुड भरारी घेत थेट भारतीय हवाईदलात उत्तुंग यश संपादन केलं आहे. मध्यप्रदेशमधील निमच गावातील सुरेश गंगवाल यांच्या आंचल गंगवाल या मुलीनं आपल्या बापाचं नाव देशात केलं आहे. आंचल गंगवाल एअरफोर्स अ‍ॅकेडमीत अव्वल आली असून आता ती फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून आकाशात झेप घेणार आहे.

२० जून रोजी हैदराबाद येथील डंडीगल वायुदल अकादमीत पार पडलेल्या कंबाइंड ग्रॅज्युएशन परेडमध्ये मध्य प्रदेशमधील छोट्या गावातून आलेल्या आंचल गंगवाल हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. २० जून रोजी झालेल्या परेडकडे गंगवाल कुटुंबासह निमच गावाचं लक्ष लागलं होतं. २१ तारखेला होणाऱ्या जागतिक पितृदिनाच्या पूर्वसंध्येला मुलीने केलेल्या कामगिरीमुळे सुरेश गंगवाल यांची छाती अभिमानाने फुलून आली होती. आंचल गंगवाल हिला परेडमधील मार्च पास्ट नंतर वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बीकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

आंचल गंगवाल हिचे वडील सुरेश गंगवाल मध्य प्रदेशमधील निमच येथे चहा विकण्याचा व्यवसाय करतात. सुरेश यांनी चहा विकून आपल्या तिन्ही मुलांचे आयुष्य उज्वल केलं आहे. सुरेश यांचा मोठा मुलगा इंजिनिअर आहे तर आंचल आता फ्लाईंग ऑफिसर झाली असून छोटी मुलगी बी. कॉम मध्ये शिक्षण घेत आहे.