मालकाने ‘मी येईपर्यंत कुठे जाऊ नकोस’ असे आपल्या पोपटाला बाजावून झाडावर सोडले. पण तासन् तास काही मालक परत आला नाही. कावळ्याने या पोपटाला बोचून खाल्ले. पण, मालकाने सांगितलेली सूचना या पोपटाला आपल्या जीवापेक्षाही जास्त महत्त्वाची होती. म्हणून तो जागचा हलला नाही. त्यामुळे मालक आणि पोपटाच्या प्रेमाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमेरिकेच्या ऑरेगॉन राज्यातील क्रेग बकनर नावाच्या माणसाने आपल्या सोबत पोपट पाळला होता. या पोपटावर बकनरचा खूपच जीव होता. बकनरवर ड्रग्ज आणि चोरीचे आरोप होते. या सुनावणीसाठी त्याला कोर्टात हजर राहायचे होते. यावेळी त्याने आपल्या सोबत पोपटालाही नेले. न्यायाधीय अपराधासाठी कदाचीत आपल्याला दंड आकारून सोडतील असे त्याला वाटले. कोर्टात जाताना मात्र पोपटाला आत आणण्यास मनाई असल्याने त्याने त्याला शेजारच्या झाडावर ठेवले. जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत तिथून न हलण्याची सूचना केली. पण न्यायाधीशांनी मात्र त्याला तुरूंगवास ठोठावला आणि पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. न्यायाधीशाने आपल्याला शिक्षा ठोठावली याचे क्रेगला दु:ख नव्हते. तर त्याला काळजी होती ती आपल्या पोपटाची. तो सतत आपल्या पोपटाचे नाव बरळत होता. त्यामुळे एका पोलीस अधिका-याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर तिथे खरच पोपट होता. कावळ्याने बोचून या पोपटाला जखमी केले होते. पण तो जागचा हलला नव्हता.

शेरिफ पोलिसांनी या पोपटाला ताब्यात घेतले आणि त्याला क्रेगकडे परत सोडले. क्रेगकडे आल्यावर हा पोपट त्याला काही केल्या सोडायला तयार नव्हता. क्रेगच्या खांद्यावर तो कितीतरी वेळ बसून होता. अखेर क्रेगने आपल्या मित्राला फोन करून त्याची काळजी घ्यायला सांगितली. क्रेग तुरुंगातून परतत नाही तोपर्यंत हा पोपट तिथेच राहणार आहे.