‘इच्छा तिथे मार्ग!’ अशी एक म्हण आहे. मुंबईतील एका १९ वर्षांच्या मुलाने या म्हणीला साजेसा कारनामा केला आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी अनोखे करण्याच्या ध्यासातून त्याने कारची निर्मिती केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने भंगार मधून एक कार मिळवली, यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहिले आणि कार अॅसेंबल केली. एका सेकंड हॅण्ड गाडीच्या इंजिनचा त्याने या गाडीत वापर केला आहे. इंजिनिअरिंगशी काहीही संबंध नसलेला प्रेम ठाकूर नावाचा हा मुलगा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. यूट्यूबवरील VideoVolunteers नावाच्या चॅनलने त्याचा हा कारनामा जगासमोर आणला. चार महिन्यांपर्यंत कारच्या चासीच्या वेल्डिंगचे काम पूर्ण करून रंगाचे कामदेखील स्वतःच केल्याची माहिती त्याने या व्हिडिओमध्ये दिली आहे. प्रेमचे वडील रिक्षाचालक असून कार निर्मितीचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. कशीबशी पैशाची सोय करत प्रेमने अडीच लाख रुपये खर्चून आपले कार निर्मितीचे स्वप्न साकारले. कुटुंबियांची आणि इंटरनेटची साथ नसती तर आपण ही कार निर्माण करू शकलो नसतो अशी भावना प्रेमने व्यक्त केली. आपण निर्माण केलेली कार रेस ट्रॅकवर पळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रेमच्या मनात आता ऑटोमोबाईल इंजिनियर बनण्याची इच्छादेखील निर्माण झाली आहे.
इंटरनेटवरील यूट्यूब हा असा मंच आहे जिथे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेक व्हायरल व्हिडिओ, म्युझिक व्हिडिओ, चित्रपटांच्या व्हिडिओंसह खूप काही इथे उपलब्ध आहे. तुम्हाला गिटार वाजवायला शिकायचंय, डिएसएलआर कॅमेऱ्याद्वारे उत्कृष्ट छायाचित्र टिपण्याचे तंत्र आत्मसात करायचंय, अगदी टाय बांधण्याची कला जरी शिकायची असेल तरी असे शेकडोंनी व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. इथे लाखोंनी Do-It-yourself (DIY) प्रकारातील व्हिडिओ उपलब्ध आहेत. जे पाहून तुम्ही खूप काही शिकू शकता. प्रेमनेदेखील अशाचप्रकारे व्हिडिओच्या मदतीने आपले कार निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले.
‘इच्छा तिथे मार्ग!’ या सुरुवातीला दिलेल्या म्हणीमध्ये आजच्या इंटरनेटच्या युगात ‘इच्छा तिथे यूट्यूब!’ असा बदल केल्यास वावगे ठरणार नाही.

Video : पाहा प्रेमला गाडी चालवताना –