लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा सोहळा असतो. हा सोहळा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये फोटोशूटलाही विशेष स्थान असते. लग्नसोहळ्याचे क्षण कायमचे साठवून ठेवण्यासाठी फोटोशूट आणि व्हिडियो शूटला विशेष महत्त्व आहे. पण लग्नाच्याच दिवशी तेही व्हिडियोशूट करतानाच नवदांपत्याबरोबर काही अपघात झाला तर? हा विचारही आपल्याला हलवून टाकणारा असला तरीही अशाीच एक घटना नुकतीच घडली आहे. विशेष म्हणजे हे दांपत्य या अपघातातून थोडक्यात बचावले आहे.
ही घटना कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Freddy Hernandez Photography & Media या फेसबुक पेजवरुन हा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये खाली ‘नव्या नव्या लग्नानंतर समोर ऊभा ठाकला मृत्यू’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडियोमध्ये नवरा आणि नवरी एका झाडाखाली बसल्याचे दिसत आहे. चेयेन आणि लुकास कोपेश्काते अशी या दोघांची नावे असून आपली लव्हस्टोरी सांगत असताना अचानक त्यांच्यावर झाड पडते. मात्र काही कळायच्या आतच हे दोघेही तिथून पळ काढत असल्याचेही यामध्ये दिसत आहे. त्यामुळे ते अगदी थोडक्यात बचावले आहेत असे म्हणायला हरकत नाही.
सोशल मीडियावर या व्हिडियोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत हा व्हिडियो ६८ हजार लोकांनी पाहिला असून ११४ जणांनी तो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये या नवदांपत्याच्या लग्नातील काही क्षणही समाविष्ट करण्यात आले आहेत. या जोडप्याचे प्रेम हे पडलेल्या झाडापेक्षा नक्कीच घट्ट असेल असेही लिहीण्यात आले आहे. पण असा प्रसंग कोणावरच ओढवू नये अशी प्रार्थना मात्र पाहणारा प्रत्येक जण मनोमन करत असेल.