कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर अशा अनेक बातम्या आपण पाहत असतो, ज्यामध्ये काही लोक शुन्यातून विश्व निर्माण करतात आणि खूप श्रीमंत होतात. सध्या अशाच एका तरुणाची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे, ज्याचे वडील हातगाडी ओढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यावेळी त्यांना कोणी ५०० रुपयांचेही कर्ज द्यायलाही तयार नव्हते, पण आज त्यांच्या मुलाकडे भरपूर पैसा आहे. ही गोष्ट आहे प्रसिद्ध युट्यूबर रॉकी अब्बास नावाच्या तरुणाची. जो आज युट्यूबच्या माध्यमातून महिना लाखो रुपये कमावते. त्याने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याची प्रेरणादायी कहाणी सांगितली आहे. ज्यामध्ये त्याने तो कशाप्रकारे यशस्वी झाला ते सांगितलं आहे. तसेच घरची परिस्थिती सुधारण्यासाठी मुलांना शिकवायला सुरुवात करा, असंही रॉकीने सांगितलं. परंतु, शिक्षणातून त्यांना काही साध्य झालं नाहीतर काहीतरी मोठं करावं लागेल असंही तो म्हणाला.
रॉकी व्यवसायाने एक युट्यूबर आहे. तो म्हणाला माझे वडील मजूर म्हणून काम करायचे जे पाहून वाईट वाटायचं. त्यामुळे मी ज्यातून चांगले पैसे मिळतील असं काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर एका कल्पनेमुळे नशीब पालटून गेले. त्याने सांगितलं त्याच्या आयुष्यात काहीही बरोबर होत नव्हते, कोणाचाही पाठिंबा मिळत नव्हता. शिवाय आपण अतिशय गरीब कुटुंबातील असून उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी असल्याचंही त्याने सांगितले. तर तो यूपीहून दिल्लीला बीडीएसचा अभ्यास करण्यासाठी आला त्यावेळी त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तो म्हणाला दिल्लीला आल्यानंतर तो निवांत वेळेत त्याचा मोबाईल स्क्रोल करत होता. यावेळी त्याने यूट्यूबद्वारे पैसे कसे कमवायचे याबाबतचा एक व्हिडीओ पाहिला आणि त्याने व्हिडीओ बनवायचं ठरवंल.




हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रॉकीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की, पहिला व्हिडिओ बनवत होतो त्यावेळी लोक माझ्याकडे वळून वळून बघत होते. त्यामुळे व्हिडीओ बनवता आला नाही. दुसऱ्यांदा व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कोणीतरी माझ्या हातातील मोबाईल घेऊन पळालं. पण तरीही मी व्हिडीओ बनवत राहिला आणि पाच महिन्यांनंतर मला यश मिळालं आणि मला यूट्यूबकडून २० हजार रुपये मिळाले. आज रॉकीटे हजारो फॉलोअर्स असून तो वेगवेगळे व्लॉग बनवतो. सुरुवातीला त्याला महिन्याला ५० हजार रुपये मिळत होते. त्यानंतर हळूहळू त्याला एक लाख, दोन लाख, पाच लाख आणि आता तो महिन्याला १० लाख कमवतो.
परंतु दुर्देवाने त्याचे वडील हे सर्व पाहण्यासाठी जिवंत नसल्याचंही रॉकीने सांगितलं. शिवाय तो म्हणाला माझ्या इतर कुटुंबीयांना अजूनही विश्वास बसत नाही की मी एवढे पैसे कमावतो. तसेच त्याने यावेळी बोलताना सांगितलं की, मी व्हिडीओ शूट करताना माझ्या लहान भावाने नवीन फोन घेण्यासाठी मदत केली होती. त्याला आता रॉकीने आयफोन घेऊन दिला आहे. तो म्हणतो की, यूट्यूबमुळे त्याचे नशीब बदलले आहे. लोकांना सल्ला देताना तो म्हणाला, “आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करत रहा, एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.”