पाकिस्तान एक पिता आपल्या मुलांना रस्त्यावर उभं राहून विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस कर्मचारी असणारा हा व्यक्ती ५० हजारात मुलांना विकत घेण्यासाठी ओरडत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव निसार लसहरी असून तो पोलीस कर्मचारी आहे. निसार कारागृह विभागात कार्यरत आहे. निसार आपल्या मुलांसोबत रस्त्यात उभा राहून आपला संताप व्यक्त करत होता. यावेळी अचानक तो आपल्या लहान मुलाला उचलतो आणि ५० हजारात विकत असल्याचं ओरडण्यास सुरुवात करतो. एका युजरने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

निसारला आपल्या मुलाच्या उपचारासाठी सुट्टी हवी होती. पण त्याच्या वरिष्ठांनी सुट्टी देण्यासाठी लाच मागितली. निसार लाच देऊ शकला नाही म्हणून त्याची सुट्टी रद्द करत शहरापासून दूर १२० किमी अंतरावर त्याची बदली करण्यात आली.

“मी लाच देऊ शखलो नाही म्हणून ही शिक्षा मला कशासाठी? मी तक्रार दाखल करण्यासाठी प्रवास करुन कराचीला जावं इतकेही पैसे माझ्या खिशात नाहीत. हे लोक खूप प्रभावशाली असून त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही”, असा संताप निसारने व्यक्त केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात चौकशी

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली असून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसंच निसारला मुलाच्या ऑपरेशनसाठी १४ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.