सध्या मोबाइल गेम म्हटलं की सर्वात आधी नाव घेतलं जातं ते म्हणजे पबजीचं. जगात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या मोबाइल गेम्समध्ये पबजीचा समावेश होतो. भारतासह संपूर्ण जगात पबजीचे असंख्य चाहते आहेत. विशेषत: तरुणाइला या गेमचं प्रचंड वेड आहे. या गेमच्या वेडापायी खाणं-पिणं सोडल्याच्या, अगदी आत्महत्या केल्याच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. अनेकदा या गेमवर बंदी आणण्यासंदर्भातील बातम्याही समोर आल्या मात्र या गेमचं वेड काही कमी झालेलं नाही. त्याचमुळे या गेमचे चाहते आणि युझर्सची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. असं असतानाच आता सेन्सर टॉवर या डेटा अॅनिलिसीस फर्मने दिलेल्या आकडेवारीनुसार पबजी हा मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात जगातील सर्वाधिक कमाई करणारा मोबाइल गेम ठरला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा गेमही चिनी कंपन्याच्या मालकीचा आहे. त्यामुळे एकीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामधून चीनला विरोध केला जात असतानाच दुसरीकडे कमाईच्या आकड्यांमध्ये चीनी कंपन्याच बाजी मारताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पबजी तर मोफत आहे मग या गेमच्या माध्यमातून कंपनी कमाई कशी करते. तर या गेमच्या आहारी गेलेले हजारो प्लेअर्स या गेममधील काही विशेष फिचर्स पैसे देऊन विकत घेतात. यामध्ये वेपन स्कीन्स, कॅरेक्टर स्कीन यासारख्या गोष्टी अनेकजण पैसे देऊन विकत घेऊन गेम खेळतात. याच हौशी गेमर्समुळे कंपनीला मे महिन्यामध्ये २२६ मिलीयन डॉलर म्हणजेच एक हजार ७१४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

पबजीला झालेला फायदा हा एकंदरित आकडेवारी असून यामध्ये पबजीच्या सर्व व्हर्जनच्या कमाईचा समावेश आहे. गेम फॉर पीस किंवा पीस किपर एलीट यासारख्या गेम्समधूनही या कंपनीच्या कमाईमध्ये भर पडली आहे. पबजी गेम हा टेनसेंट या चीनी कंपनीच्या मालकीचा आहे.

सर्वाधिक कामाई करणाऱ्या मोबाइल गेमच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावरही पबजीची मालकी असणारी चीनी कंपनीची आहे. टेनसेंटच्या मालकीच्या या गेमचे नाव आहे ऑनर ऑफ किंग्स. एका किल्ल्यामध्ये शिरण्यासाठी लढाई करण्याच्या थीमवर आधारित हा गेमही प्रचंड लोकप्रिय आहे. या गेमनेही २०५ मिलीयन डॉलर म्हणजेच १५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मागील वर्षांपेक्षा ही कमाई ४२ टक्क्यांनी अधिक आहे.

मोबाइल गेमच्या क्षेत्रामध्ये चीनची मत्तेदारी असून ९५ टक्के महसूल हा चीनी कंपन्यांचा आहे. २.२ टक्के महसूल थायलंडमधील कंपन्यांच्या मालकीचा आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pubg mobile is top earning game in the world with rs 1714 crore revenue in may scsg
First published on: 17-06-2020 at 15:03 IST