Russian woman married Indian man: विदेशी महिला भारतीय पुरूषाच्या प्रेमात पडण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अगदी सीमा हैदरपासून पाश्चिमात्य देशांतील तरूणी भारतीय पुरूषाच्या प्रेमात आपलं जग सोडून भारतात स्थायिक होतात. सध्या एका रशियन महिलेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ही महिला आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी काही आठवड्यांसाठी भारतात आली होती. मात्र भारतीय पुरूषाच्या प्रेमात पडल्यानंतर आता ती कायमची इथेच राहत आहे. भारतीय पुरूषाशी लग्न का केले? याबाबतची तीन गमतीशीर कारणे या महिलेनं सांगितली आहेत.

प्रेम करण्याची तीन कारणे कोणती?

सदर महिलेचे नाव केसेनिया चावरा असून तिचा “मी भारतीय माणसाशी लग्न का केले, याची ३ कारणे” या शीर्षकासह असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केसेनियाने तिच्या लहान बाळाची आणि तीची झलक दाखवली आहे. तसेच “जगातील सर्वात चांगला पती, मी तुझ्यावर प्रेम करते”, असे कॅप्शन व्हिडीओला दिले आहे.

या व्हिडीओत केसेनियाने काही ओळी टाकल्या आहेत. त्या ती भारतीय पुरूषाशी लग्न केल्याची तीन कारणं सांगते. ती म्हणते, तो माझ्यासाठी स्वयंपाक करतो, आमच्या गोंडस बाळाला तो चांगला तयार करतो आणि नेहमी माझी काळजी घेतो व माझ्यावर प्रेम करतो.

या व्हिडीओला आतापर्यंत २२ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर अनेकांनी व्हिडीओखाली कमेंट करून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावरील निवडक प्रतिक्रिया?

या जोडप्याला सोशल मीडियावरील नेटीझन्स भरभरून प्रतिसाद देत आहेत. अनेकांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले, तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, खूपच छान, हे पाहून त्याला (नवऱ्याला) अभिमान वाटेल. तर तिसऱ्या युजरने लिहिले की, नवरा जेवण बनवतो, हे खूप गोड आहे. तुम्ही दोघेही आनंदी राहा.

दरम्यान जुलै महिन्यात आणखी एक रशियन महिला चर्चेत आली होती. कर्नाटकच्या गोकर्ण येथील जंगलात एका गुहेत दोन लहान मुलांसह राहणाऱ्या रशियन महिलेची पोलिसांनी सुटका केली होती. ही महिला आठ वर्षांपासून भारतात राहत होती. तर गेल्या काही काळापासून तिचे या गुहेत वास्तव्य होते. नीना कुटीना (वय ४०) असे या महिलेचे नाव आहे.

नीना कुटीना ही बिझनेस व्हिसावर २०१६ मध्ये पहिल्यांदा भारतात आली होती आणि सुरूवातीला ती गोवा आणि गोकर्ण येथील पर्यटन आणि रेस्टॉरंट यांच्याकडे आकर्षित झाली. “पण जेव्हा १७ एप्रिल २०१७ रोजी तिचा व्हिसा समाप्त झाला तेव्हा निघून जाण्याऐवजी तिने येथेच राहण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये एक्झिट परमीट मिळाल्यावर आणि काही काळासाठी नेपाळला गेल्यानंतरही ती भारतात परत आली आणि कर्नाटकच्या जंगलात राहू लागली,” अशी माहिती पोलिसांनी दिली.