टेनिसची सुपरस्टार सेरेना विल्यम्सने नुकताच एक व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये तिने टॉपलेस होऊन एक गाणे गायले आहे. तिच्या या व्हिडियोची सर्वत्र जोरदार चर्चा असून हे गाणे कोणते आणि ते तिने का गायले याबाबत चर्चा आहे. तर हा व्हिडियो तिने अतिशय चांगल्या कामासाठी शूट केला असल्याचे समजते. महिलांमध्ये वेगाने होत असलेल्या स्तनांच्या कर्करोगाविषयीची जनजागृती करण्यासाठी तिने हे गाणे गायले आहे. हा व्हिडियो तिने आपल्या इन्स्टाग्रा अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती टॉपलेस असल्याचे दिसत आहे. ५८ सेकंदाचा हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून २१ तासात १६ लाखहून अधिक जणांनी तो पाहिला आहे. अनेकांनी तिचे या कामासाठी कौतुकही केले आहे.

गाणे गाताना तिने आपले स्तन हाताने झाकले आहेत. या व्हिडियोवरील पोस्टवर ती म्हणते, स्तनांच्या कर्करोगाविषयी जागृती करण्याचा हा महिना आहे. याच निमित्ताने मी आय टच मायसेल्फ गाण्याचे एक व्हर्जन रेकॉर्ड केले आहे. महिलांना आपले स्तन नियमितपणे तपासण्याची आठवण करुन देण्यासाठी मी हा व्हिडियो केला आहे. ऑस्ट्रेलियातील डिव्हायनल्स बँडची गायक असलेल्या क्रिसी एमफ्लेट हिने हे गाणे लिहीले आहे. तिचा ५ वर्षापूर्वी वयाच्या ५३ व्या वर्षी स्तनांच्या कर्करोगाने अकाली मृत्यू झाला होता. २३ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियनशिप असलेली सेरेना म्हणते, हा व्हिडियो ‘आय टच मायसेल्फ’ अभियानाचा भाग आहे. क्रिसी एमफ्लेटाचा सन्मान म्हणून म्हणून हा व्हिडियो शूट करण्यात आला आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे सर्वात आधी लक्ष द्यावे हेच या व्हिडियोतून सांगायचे आहे.