देहरादूनमधली ११ वर्षांची शेकिना मुखिया हे नाव इथल्या लोकांना चांगलंच परिचयाचं असेल. संगीत रिअॅलिटी शोमध्ये तिची सर्वोत्तम कामगीरी सगळ्यांच्या लक्षात आहे. या रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहचली. ही स्पर्धा तिनं जिंकली नसली तरी लोकांची मनं मात्र तिनं जिंकली. अर्थात रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानं तिला शाळेत उपस्थित राहता येईना. तिच्या गैरहजेरीमुळे तिला सहावीतून पुढच्या कक्षेत प्रवेश देण्यात मुख्याध्यापकानं नकार दिला. अखेर मुलीचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिच्या वडिलांनी कोल ब्राऊन केंब्रिज स्कूलच्या मुख्यध्यापकांकडे मुलीला प्रवेश देण्याची विनंती केली. ही शहरातील प्राख्यात आणि मुलांची शाळा आहे. या शाळेनं पहिल्यांदाच आपली परंपरा तोडून शेकिनाला आपल्या शाळेत प्रवेश दिला आहे.

पंन्नास वर्षांनंतर या शाळेत शिकणारी शेकिना ही पहिलीच मुलगी आहे. तिच्या वर्गात सगळेच मुलं आहेत. येत्या १२ एप्रिलपासून तिची शाळा सुरू होत आहे. शेकिनामध्ये असलेले कलागुण पाहून तिला शाळेनं ही संधी दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शेकिना म्हणाली मला मुलांच्या शाळेत प्रवेश मिळाला असला तरी मी खूप खूश आहे. मला मोठं होऊन उत्तम गायिका व्हायचं आहे पण, त्याचबरोबर मला माझं शिक्षणही पूर्ण करायचं आहे.

शेकिनाला मुलांसारखाच गणवेश अत्यावश्यक असणार आहे त्यामुळे मुलांसारखी शर्ट आणि पँट घालून येणं बंधकारक असणार आहे. वर्गमित्रांसोबत शेकिना रुळेल याची पुरेपुर काळजी घेण्यात आलीय. शेकिनाचं आई वडिलाही शिक्षक आहेत. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. मुलीला मुलांप्रमाणे समान वागणूक देण्याची तसेच चौकट मोडण्याची प्रेरणा या चित्रपटानं मला दिली. म्हणूनच मी शेकिनाचं नाव मुलांच्या शाळेत घातलं असं तिचे वडील म्हणाले. शेकिनाच्या आधी १९४० आणि १९५० मध्ये एकूण तीन मुली येथे शिकल्या होत्या. १९२९ साली स्थापन झालेल्या या शाळेत राज कपूरही शिकले आहेत.