ग्राहकाभिमुख सेवा, सुविधा नसल्यास त्यामुळं नागरिकांना किती अडचणींना सामोर जावं लागतं याचं एक ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. त्याचबरोबर आपल्या व्यवस्थेवर कोरडे ओढणारा हा धक्कादायक प्रसंग ठरला आहे. बँकेच्या सूचनेनुसार एका ज्येष्ठ महिलेने आपल्या १२० वर्षांच्या आईच्या पेन्शनसाठी खाटेवर टाकून बँकेत घेऊन जाणं भाग पडलं. ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील खरिअर ब्लॉकमधील बारगन गावात गुरुवारी ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुत्रांच्या माहितीनुसार, १२० वर्षांच्या वृद्ध महिलेनं आपली ७० वर्षीय मुलगी गुंज देई यांना बँकेतील आपल्या पेन्शन अकाऊंटमधून १,५०० रुपये काढण्यासाठी बँकेत पाठवले. ज्यावेळी गुंज देई बँकेत पोहोचल्या तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी त्यांना पेन्शनची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच खातेधारक महिलेला प्रत्यक्ष बँकेत हजर करण्यास सांगितले. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

गुंज देई या स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातच १२० वर्षे वय असलेल्या त्यांच्या आईला चालता येत नाही त्या अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे गुंज देई यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी एका खाटेवर आईला टाकून ओढत ओढत बँकेत नेले. जेव्हा गुंज देई आपल्या आईला खाटेवरुन घेऊन बँकेत पोहोचल्या तेव्हा त्या दोघींचे वय आणि अवस्था पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीने पेन्शनची रक्कम काढून दिली.

दरम्यान, गुंज देई यांनी आपल्या आईला खाटेवरुन ओढत बँकेत नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्विटर युजर्सनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीकस्त्र सोडलं. या घटनेची दखल स्थानिक प्रशासनाला देखील घेणं भाग पडलं. प्रशासनानं सर्व प्रकारच्या बँकांच्या मॅनेजर्सना लिखित आदेश दिले की, बँकांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा पुरवण्यात यावी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking for pension the senior woman had to take her 120 year old mother out on bed to the bank aau
First published on: 14-06-2020 at 10:41 IST