Sister Protecting Little Brother Video Viral : आयुष्यात मोठी बहीण असणं ही खूप भाग्याची गोष्ट असते, कारण ती लहान भावंडांवर आईप्रमाणे प्रेम करते, काळजी घेते. अनेकदा आई-वडील लहान भावंडांना ओरडत असतील तर ती पुढे येऊन त्यांची बाजू घेते, त्यांच्यासमोर स्वत: खलनायक बनते, पण लहान भावंडांना वाचवते. अशाच एका भावा-बहिणीच्या नात्याचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही तुमच्या मोठ्या बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही; कारण यात एक चिमुकली लहान बहीण आपल्या धाकट्या भावासाठी थेट वडिलांशी कचाकच भांडतेय.

व्हिडीओत एक वडील लहान मुलाला माती खाल्ल्याने ओरडताना दिसतायत. यावेळी मोठी बहीण भावासाठी पुढे येत वडिलांना माझ्या भावाला ओरडू नका असं वारंवार सांगतेय, तसेच घाबरलेल्या भावाला मिठी मारून त्याचे रक्षण करताना दिसतेय.

वडील लहान भावाला ओरडताच मदतीसाठी धावली बहीण (Sister defending his little brother from Dad)

व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक वडील मुलाला माती खाल्ली म्हणून जोरात ओरडताना दिसतायत. यावेळी ते पुन्हा माती खाल्लीस ना तर फटके देईन, अशी मोठ्या आवाजात धमकीदेखील देतात. याचदरम्यान चिमुकली बहीण लहान भावाच्या मदतीसाठी धावत येते आणि वडिलांना मधेच थांबवत रागात म्हणते की, तुमचं जरा अति होत नाही का? तुम्ही माझ्या भावाला का ओरडताय?’

यावेळी वडिलांना घाबरलेल्या भावाला ती कुशीत घेऊन लपवताना दिसतेय. यावेळी भाऊदेखील डोळे खाली करून बहिणीला घट्ट मिठी मारत शांतपणे उभा राहतो. यावेळी प्रेमळ बहीण त्याचे तोंड तिच्या हातांनी झाकते, जेणेकरून तो काहीही बोलू नये आणि भीतीने रडू नये.

“ओरडू नका, मी त्याची बहीण आहे” (Brother Sister Cute Viral Video)

यावेळी वडील पुन्हा ओरडताच बहीण त्यांना म्हणते की, त्याला ओरडू नका, मी त्याची बहीण आहे, त्याला तुम्ही मारू नका. यावर वडील म्हणतात की, जेव्हा जेव्हा तो माती खाईल तेव्हा तेव्हा त्याला फटके पडणार, माती खाऊन त्याच्या पोटात किडे होतील, यावर बहिणीचे उत्तर येते, मी त्याला थांबवेन. यादरम्यान बहीण चक्क वडिलांनाच मोठे डोळे करून घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

यावर वडील चिमुकलीला फटकारू लागतात, पण तरीही ती तिच्या भावाची बाजू घेण्याचं काही सोडत नाही. वडील बहिणीलाच नंतर म्हणतात की, हे नखरे करणं कमी कर आणि माझ्यासमोर डोळे खाली करायचे. यावर चिमुकली थेट ‘नाही करणार जा’ असं उत्तर देते. अशाप्रकारे ती वडिलांपासून आपल्या भावाचं रक्षण करते.

बहीण-भावाच्या नात्याचा हा सुंदर व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता लोकही संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “किती सुंदर बहीण आहे ती.” दुसऱ्याने लिहिले की, “बहिणाला वडील ओरडतायत याची चिंता नव्हती, तर तिला धाकटा भाऊ नाराज झाला याची चिंता होती.” तिसऱ्याने म्हटले की, “वडिलांची मुलांना ओरडण्याची पद्धत खूप वाईट होती.” आणखी एकाने लिहिले की “व्हिडीओ पाहिल्यानंतर माझे मन आनंदाने भरून आले.” शेवटी एकाने लिहिले की, “प्रत्येक भावाला अशी बहीण मिळो.”