विहिरीत पडलेल्या एका हत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये विहिरीत पडलेला हा हत्ती बाहेर येण्याची धडपड करताना दिसत आहे. हा हत्ती वारंवार बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ कर्नाटकच्या मलई महादेश्वरा वन्यजीव अभयारण्यातला असून इंडियन फॉरेस्ट ऑफिसर येडुकोंडालू व्ही. (Yedukondalu V) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. फॉरेस्ट ऑफिसर येडुकोंडालू व्ही. यांना हत्ती विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी वेळ न दवडता तातडीने क्रेन पाठवण्याची व्यवस्था केली. क्रेनने हत्तीला उचलणं शक्य नव्हतं, त्यामुळे क्रेनद्वारे विहिरीच्या जवळील माती हटवण्यास सुरूवात केली.

एका बाजूने माती हटवल्यानंतर हत्ती आरामात बाहेर पडला. “वन्यजीव अभयारण्यात विहिरीत पडलेल्या नर हत्तीची सुटका केली. गावकरी, पोलिस, मीडिया आणि वन-मोर्चाच्या कर्मचार्‍यांचे सहकार्याबद्दल धन्यवाद,” अशा आशयाचं ट्विट करत येडुकोंडालू यांनी हत्तीची सुटका करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून आतापर्यंत जवळपास पाच हजार युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच यावर विविध कमेंट्सही युजर्स करत आहेत. करोनाव्हायरसच्या भीतीदायक वातावरणात अशाप्रकारचा व्हिडिओ दाखल्याबाबत आभार अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्यात. तर, काहींनी विहिरीची डागडुजी करण्याचाही सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडिओ –

मलई महादेश्वरा वन्यजीव अभयारण्य 2013 मध्ये सुरू झालं असून हे अभयारण्य हत्ती , बिबट्या, हरीण या प्राण्याचे घर मानले जाते.