Staffer Falling Off Plane : विमान प्रवास इच्छित ठिकाणी लवकर पोहोचवणारा आणि आरामदायी वाटत असला तरी तितकाच प्रत्यक्षात तो धोकादायकही आहे. कधी कधी एक छोटीशी चूक शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतते. त्यामुळे विमान विमानतळावरून टेक ऑफ करण्यापूर्वी त्यात काही गडबड तर नाही ना याची कसून तपासणी केली जाते. विमान विमानतळावर उभे असते तेव्हा ग्राउंड स्टाफ आणि एअरलाइन्स कर्मचारी विमानाची कसून तपासणी करतात. त्यात विमानाचा दरवाजा उघडणे आणि बंद करणे या गोष्टींचाही समावेश असतो. विमानातील प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित तपासणी केल्यानंतरच विमान टेकऑफ करते. सध्या सोशल मीडियावर विमान अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून लोक हैराण झाले आहेत.
विमानतळावरील एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांचातीलच एक कर्मचारी अचानक विमानातून खाली पडला. हे प्रकरण इंडोनेशियातील असल्याचा दावा केला जात आहे. एक कर्मचारी विमानातून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याचदरम्यान विमान कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी विमानाला लागून असलेली शिडी ओढली आणि पुढे नेण्यास सुरुवात केली. यावेळी तो कर्मचारी खाली उतरण्यासाठी म्हणून शिडी आहे, असे समजून पुढे पाय ठेवतो; पण ती शिडी इतर कर्मचाऱ्यांनी पुढे नेली असल्याने तो कर्मचारी जोरात खाली कोसळतो.
विमानातून थेट कोसळला खाली
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानातील उपस्थित कर्मचारी कोणाशी तरी बोलत आहेत आणि ते बोलणे सुरू असतानाच तो न बघता, शिडीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, शिडी दोन कर्मचाऱ्यांनी ओढत पुढे नेली असल्याने तो खाली कोसळतो. यावेळी त्याच्या हातातील कागदपत्रेदेखील हवेत उडून सर्वत्र पसरतात. तो विमानातून थेट खाली अतिशय जोरात कोसळतो.
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @sjlazars नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे; तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे.
त्याचबरोबर व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने राग दर्शविणारी कमेंट केली, “त्यांनी विमानाचा दरवाजा बंद न करता, शिडी कशी काढली? हा मूलभूत SOP नाही का! कोणत्याही ग्राउंड स्टाफ / क्रूसाठी हे एक भयानक स्वप्न आहे.” दुसऱ्या युजरने असा दावा केला आहे की, अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांगली गोष्ट म्हणजे त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.