कामासाठी दुबईत गेलेल्या जगन्नाथन सेल्वाराज यांनी मायदेशी परतण्यासाठी दुबईच्या वाळवंटातून चक्क एक हजार किलोमीटरची पायपीट केली. दुबईच्या श्रमिक न्यायलयात त्यांचा खटला सुरू आहे. त्यांना मायदेशी परतण्याची परवानगी न्यायालयाने नाकारली होती. त्यामुळे, या खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांना प्रत्येक वेळी पायी न्यायालयात जावे लागते.
वाचा : दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम
जगन्नाथ सेल्वाराजन दुबईत कामानिमित्त गेले होते. त्यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. यासाठी त्यांना भारतात परतायचे होते. परंतु दुबईच्या श्रमिक कामगार न्यायालयाने त्यांना भारतात जाण्याची परवानगी नाकारली. सेल्वाराजन हे ४८ वर्षांचे असून तामिळनाडुमधल्या तिरुचिरापल्लीचे येथील ते निवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात हा खटला सुरू आहे. ते दुबईतल्या सोनापूर येथे राहतात. या भागात जगभरातून आलेले श्रमिक कामगार राहतात. त्यामुळे श्रमिक कामगारांची वस्ती म्हणून हा भाग ओळखला जातो. या भागातून त्यांना दरवेळी दुस-या जिल्ह्यात असणा-या न्यायालयात पायी चालत जावे लागत आहे.
करामा जिल्ह्यात श्रमिक न्यायालय आहे. त्यामुळे भारतात परतण्याची परवानी मिळवण्याकरता त्यांना वारंवार तिथे जावे लागत आहे. त्यांच्या राहत्या घरापासून ही जागा ५४ किलोमीटर दूर आहे. त्यामुळे ते दरदिवशी पाच तास पायी प्रवास करून न्यायालयात सुवानणीसाठी हजेरी लावतात. त्यांना महिन्यातून किमान दोनदा तरी या ठिकाणी फक्त २० मिनिटांसाठी हजेरी लावाली लागते. यासाठी ते पहाटे चार वाजता घरातून निघतात. बस किंवा गाडी भाडे देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे वाळवंटातून चालत या ठिकाणी ते येतात. पैसे नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते दुबईतल्या एका सार्वजनिक पार्कमध्ये राहत आहेत. ‘खालीज टाईम्स’ने त्यांची ही दु:खद कथा जगासमोर आणली आहे.