ख्रिसमस जवळ आला की शांळामध्ये ख्रिसमसचे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. यामध्ये नाताळ पार्टीबरोबरच सांताकडून भेटवस्तू घेणे आणि त्यासाठी सांताला पत्र लिहिणे असेही उपक्रम राबवले जातात. यामध्ये अनेक शाळा मुलांनी लिहिलेल्या वस्तू नाही पण बाकी काहीतरी त्यांना भेटवस्तू म्हणून देण्याचाही प्रयत्न करतात. टेक्सासमधील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या क्रीस्टल नामक चिमुकलीने केलेली मागणी हृदय हेलावून टाकणारी आणि लक्षवेधक होती. यातही केवळ पत्र आणि तिने व्यक्त केलेली इच्छा याच्यापुढे अनेक गोष्टी घडल्या. विशेष म्हणजे या चिमुकलीच्या शिक्षिकेने पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले.

आता असे काय झाले की या विषयाची इतकी चर्चा व्हावी. तर आपल्याला सांताला लिहायला सांगितलेल्या पत्रात या चिमुकलीने सांताला आपल्याला अन्न, ब्लँकेट आणि बॉल हवे असल्याचे सांगितले. आता एका शाळेत एका चिमुकलीने मागितलेल्या इच्छेला कितपत प्रतिसाद मिळेल असा प्रश्न सहाजिकच कोणालाही पडेल. सगळ्या मुलांची पत्रे वाचत असताना शिक्षिकेला हे पत्र सापडले. त्यामध्ये या चिमुकलीने केलेल्या मागणीकडे या शिक्षिकेचे लक्ष वेधले गेले. क्रिस्टलने आपल्या पत्रातून केलेल्या या मागणीला त्यांनी गांभिर्याने घेत हे पत्र आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले. क्रिस्टलला आणि तिच्या कुटुंबियांना अशाप्रकारे काही आर्थिक अडचण असेल हे या शिक्षिकेच्या कधी मनातही आले नव्हते.

सोशल मीडिया हे सध्या अतिशय प्रभावी माध्यम आहे. मात्र त्यावर इतका प्रतिसाद येईल असे या शिक्षिकेला वाटले नाही. मात्र फेसबुक पोस्टचा झालेला परिणाम पाहून ही शिक्षिकाच नाही तर शाळेतील सर्वच शिक्षक आश्चर्यचकित झाले. कारण क्रीस्टलच्या मागणीला प्रतिसाद देत देशातून आणि परदेशातून तिच्यासाठी तब्बल ९०० ब्लँकेट्स आले. या शाळेत सध्या ७२४ विद्यार्थी शिकतात. विशेष म्हणजे हा ब्लँकेटस येण्याचा ओघ अजूनही सुरुच असल्याचे शाळेच्या प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे क्रीस्टलच्या एका मागणीसाठी इतके सांता धावून आले.