जेव्हा समाजासाठी एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नाही. इच्छाशक्ती, मोठे मन त्यासाठी पूरेसे आहे. याच इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही समाजातील अनेक गरीबांचे भले करु शकतात. जर तुम्हाला हे वाक्य अतिशयोक्त वाटत असेल तर तुम्हाला तेजींदर पाल सिंग यांच्याबद्दल जाणून घ्यायलाच हवे. ऑस्ट्रेलियातील मानाच्या समजल्या जाणा-या एका पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. २००६ पासून आपल्या कुटुंबियांसोबत ऑस्ट्रेलियात राहत असलेले तेजींदर सिंग हे महिन्यातून एकदा आपल्या भागातील गरिबांना मोफत जेवण देण्याचे पुण्यकाम करतात आणि याच सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
२००६ पासून तेजींदर सिंग हे ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. दिवसा ते मॅकेनिक म्हणून काम करतात आणि रात्रीच्या वेळी ते टॅक्सी चालवतात. आपल्या कुटुंबासाठी ते दिवसरात्र मेहनत करतात पण २४ तास मेहनत करून कमावलेले पैसे हे स्वत:साठी खर्च न करता तेजींदर हे गरीबांसाठी खर्च करतात. महिन्यातून एकदा ते गरिबांना मोफत अन्न वाटप करतात. तो आणि त्यांचा छोटा मुलगा दर महिन्याला फूड वॅनमधून गरीबांसाठी अन्नाचे वाटप करतात. रात्रभर टॅक्सी चालवून आल्यानंतर ते ८० किलो भात आणि आमटी गरीबांसाठी बनवतात. त्यांच्यामुळे एक दिवस का होईना गरीबांना पोटभर जेवायला मिळते. तेजींदर हे ऑस्ट्रेलियातील श्रीमंतांपैकी नक्की नाही, पैशाने ते जरी श्रीमंत नसले तरी मनाने मात्र ते नक्कीच खूपच श्रीमंत आहेत.