TCS Employee Stress: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) नोकरकपातीची घोषणा केल्यापासून आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टीसीएसचे जगभरात सहा लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यापैकी १२ हजाराहून अधिक कर्मचारी चालू वर्षात कमी केले जाणार आहेत. तसेच यंदा कर्मचाऱ्यांची पगारवाढही रोखण्यात आली आहे. यामुळे टीसीएसमधील अनेक कर्मचारी तणावातून जात आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच पीआयपी (PIP) अर्थात कामगिरी सुधारणा योजनेत टाकले आहे, ते कर्मचारी सर्वाधिक तणावात आहेत.

टीसीएसमध्ये दोन वर्ष काम केल्याचा अनुभव असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याची परिस्थिती रेडिट या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्टद्वारे मांडली आहे. आयटी क्षेत्र अनिश्चितितेच्या गर्तेत गेल्याचे त्याचे म्हणणे आहे.

पीआयपी आणि नोटीस पिरियडची कात्री

कर्मचाऱ्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “टीसीएस कंपनीने मला पीआयपीवर टाकले आहे. मी दोन वर्षांपूर्वी रुजू झालो होतो. यावर्षी मला डी बँड देण्यात आला आहे. माझा प्रकल्पही बदलला आहे आणि मला बदललेल्या वेतनाचे पत्र दिले आहे. मी रुजू झालो, त्यापेक्षाही कमी वेतन या पत्रानुसार मिळत आहे. दोन महिन्यांसाठी मला पीआयपीवर टाकले असून आत याला दोन आठवडे झाले आहेत.”

या कर्मचाऱ्याने पुढे लिहिले, जर मी आता राजीनामा टाकला तर मला तीन महिन्यांचा नोटिस परियड पूर्ण करावा लागेल का? असे केल्यास मला सर्व कागदपत्रे (अनुभव पत्र वैगरे) कंपनीकडून मिळतील का? जर माझ्या वरिष्ठाने माझ्याबद्दल सकारात्मक शेरा दिला नाही, तर मग पुढे काय होईल? मला कामावरून काढले जाईल की राजीनामा टाकण्यास सांगितले जाईल?

अनेक आयटी कंपन्यांनी नोकरकपातीची सुरुवात केल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण दिसून येत आहे.

नोकरी जाण्याची भीती आणि मानसिक गुंतागुंत

पगारवाढ झाली नाहीच उलट आहे तो पगारही कमी झाला, याबद्दलही सदर कर्मचाऱ्याने चिंता व्यक्त केली आहे. “मला पगारवाढ न देता उलट त्यात कपात केल्यामुळे आता मी नवी नोकरी शोधली तरी त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो का? सध्या कंपनीची जी अवस्था आहे, त्यावरून पीआयपीवर टाकणे ही नोकरकपातीची अधिकृत सुरुवात आहे का?”, असे प्रश्न सदर कर्मचाऱ्याने उपस्थित केले आहेत.

tcs employee pip post on reddit
टीसीएस कर्मचाऱ्याची रेडिटवरील पोस्ट

“मी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कोसळलो आहे, कृपया मला मदत करा”, असे आर्जव सदर टीसीएस कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये केले आहे. टीसीएसने हजारो कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पीआयपीवर असलेले कर्मचारी अधिक चिंताग्रस्त आहेत. तज्ञाच्या मतानुसार, पीआयपीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळू शकते.