एका छोट्या विषाणूने सध्या साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह देशभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. सर्व क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्णचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहे. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. त्यातील एक म्हणजे जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हा ट्रेंड फॉलो केल्याचे दिसत आहे.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याने त्याचा एक जुना फोटो ट्विट केला. त्याने फोटो ट्विट करण्याचे कारण इतर खेळाडूंपेक्षा काहीसे वेगळे आहे. अझरूद्दीनने आपल्या काकांसोबतचा फोटो शेअर केला. ‘तुम्ही साऱ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलंत आणि संपूर्ण कारकिर्दीत माझ्या पाठीशी उभे राहिलात. पण माझा क्रिकेट प्रवास कसा सुरू झाला माहिती आहे का? माझे दिवंगत काका मीर झैनुलाबिदीन यांनी मला आयुष्यात सर्वप्रथम हातात बॅट पकडायला शिकवली. त्यांनी माझ्यात क्रिकेटबद्दल प्रेम निर्माण करून दिलं त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहिन. याच क्रिकेटने माझ्या संपूर्ण आयुष्याला आकार दिला’, अशी त्या फोटोबद्दल त्याने माहिती दिली.
You all have shown me immense love & support thru my career, but do you know how my cricket journey began? My Late Uncle, Mir Zainulabideen, made me hold the cricket bat for the 1st time. I owe it to him fr introducing me to this passion of mine which shaped me and my entire life pic.twitter.com/hR6iEgtBtD
— Mohammed Azharuddin (@azharflicks) May 21, 2020
दरम्यान, सुरूवातीला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला. भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यानेही रोहित शर्मा आणि रैनासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिनला देखील आपला जुना फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नव्हता. त्याने १९९२ मध्ये इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेतील फोटो शेअर केला. याशिवाय, दोनच दिवसांपूर्वी धवनने आपला जुना आणि आपल्या मुलाचा आताचा फोटो शेअर केला. ‘मुलगा आणि वडील यांच्या दिसण्यात फार वेगळेपण नसते’, अशा आशयाचे कॅप्शनही त्याने फोटोला दिले होते.