गेल्या महिन्यात थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या १२ मुलांनी संपूर्ण जगाचं लक्ष स्वत:कडे वेधलं होतं. या १२ मुलांपैकी तीन मुलं आणि त्यांचा कोच एकापोल याला नुकतंच थायलंडचं नागरिकत्त्व बहाल करण्यात आलं आहे. टीममधली काही मुलं जरी थायलंडमध्ये जन्माला आली असली तरी ते अधिकृतरित्या थायलंडचे नागरिक नव्हते. त्यांच्याजवळ थायलंडचं ओळखपत्रदेखील नव्हते. त्यामुळे देशात असूनही ते परकेच होते. अखेर या चौघांना नुकतंच अधिकृतरित्या नागरिकत्त्व देण्यात आलं आहे. यावर सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला आहे.
थायलंडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांचा जन्म थायलंडमध्ये झाला असला तरी ते देशाचे नागरिक नाही. देशाच्या सीमा बदलल्यानं सीमेवरील भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या नागरिकत्त्वाचा प्रश्न अजूनही मोठा आहे. त्यामुळे अशा लोकांना अद्यापही देशाचं नागरिकत्त्व देण्यात आलेलं नाही. तसेच काही लोक हे दुर्गम भागात राहतात. तिथे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा भागातील लोकांनी नागरिकत्त्वासाठी अद्यापही नोंदणी केलेली नाही. तर काही लोक कंबोडिया, म्यानमार, लाओस यांसारख्या देशांतून येथे आलेत आहेत त्यामुळे त्यांच्याजवळही थायलंडचं नागरिकत्त्व नाही.
थायलंडच्या गुहेत अडकलेल्या १३ जणांपैकी चार जणं हे थायलंडचे नागरिक नव्हते. यामुलांनी आपल्याला नागरिकत्त्व देण्याची विनंतीदेखील केली होती. अखेर आता या मुलांना देशाचे रहिवासी म्हणून नवी ओळख मिळाली आहे. थायलंड सरकारच्या या निर्णयाचं सगळ्यांची कौतुक केलं आहे. ही मुलं थायलंडच्या वाईल्ड बोअर सुकर टीमचे खेळाडू आहेत. २३ जूनला आपल्या कोचसोबत थायलंडमधली सर्वात मोठी गुहा पाहण्यासाठी ते गेले होते. मात्र अतिवृष्टीमुळे गुहेत पाणी साचलं आणि मुलं तिथेच अडकली. नऊ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर त्यांना शोधण्यात आलं. अखेर दोन आठवड्यानंतर जगातील सर्वात मोठी बचाव मोहिम राबवून त्यांना गुहेतून बाहेर काढण्यात आलं.