विश्वातील कृष्णविवरांबद्दल मानवाला कायमच आकर्षण राहिलं आहे. मागील वर्षीच एप्रिल महिन्यात कृष्णविवराची पहिली प्रतिमा मिळवण्यात यश आल्यानंतर हे कुतूहल आणखीनच वाढलं आहे. असं असतानाच आता मानवाला ज्ञात असणारे सर्वात वेगाने वाढणारे कृष्णविवर हे आपल्या सुर्यापेक्षा ३४०० कोटी पट अधिक मोठे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रोज हे कृष्णविवर सुर्याच्या आकाराचा एक तारा गिळंकृत करतं असल्याचे वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सध्या ज्या वेगाने हे कृष्णविवर वाढत आहे तो वेग वैज्ञानिकांनी मांडलेल्या अपेक्षित वेगापेक्षा दुप्पटीहून अधिक असल्याचे बिझनेस इनसायडरने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगाने वाढणाऱ्या या कृष्णविवराचे नाव जे२१५७ (J2157) असं आहे. मानवाला ठाऊक असणाऱ्या सर्वात मोठ्या आकाराचे कृष्णविवर हे अबेल ८५ (Abell 85) हे आहे. अबेल ८५ हे सुर्याहून ४००० कोटी पटांनी मोठं आहे. मात्र ज्या वेगाने जे२१५७ वाढत आहे त्यानुसार लवकरच ते अबेल ८५ पेक्षा मोठं होऊ शकतं असं सांगितलं जात आहे.

जे २१५७ हे कृष्णविवर पृथ्वीपासून १२० कोटी प्रकाशवर्ष दूर आहे. आपल्या आकशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या सॅगीटेरियर ए या कृष्णविवरापेक्षा जे २१५७ हे आठ हजार पट मोठं आहे. “जर आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असमारं कृष्णविवर इतक्या वेगाने वाढलं तर ते आपल्या आकाशगंगेतील दोन तृतीअंश तारे गिळंकृत करेल,” असं जे २१५७ संदर्भातील संशोधनाचे प्रमुख लेखक असणाऱ्या ख्रिस्तोफर ऑनकेर यांनी म्हटलं आहे. हे संशोधन मंथली नोटीसेस ऑफ द रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटीमध्ये छापून आलं आहे.

ख्रिस्तोफर यांच्या सांगण्यानुसार कृष्णविवराच्या आकारमानावर ते किती तारे गिळंकृत करु शकतं हे ठरतं. जे २१५७ हे आकाराने आधीपासूनच खूप मोठं आहे, त्यामुळेच ते दिवसाला आपल्या सूर्याएवढा मोठा तारा स्वत:मध्ये सामावून घेत आहे. आकडेवारीनुसार हे कृष्णविवर १० लाख वर्षांमध्ये एका टक्क्याने वाढत आहे.

विश्वातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृष्णविवराबरोबरच हे विश्वातील सर्वाधिक प्रकाशित होणारे कृष्णविवर ठरलं आहे. “हे कृष्णविवर इतक्या वेगाने वाढत आहे की ते सामान्य कृष्णविवरांपेक्षा हजारो पट अधिक चमकदार दिसत आहे. रोज हे कृष्णविवर अनेक तारे गिळंकृत करत आहे. त्यामुळेच मोठ्याप्रमाणात वायू निर्मिती होत आहे. खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकली जात आहे. ज्यामुळे हे कृष्णविवर अधिक प्रकाशित झालं आहे,” असं या कृष्णविवराचा शोध घेणारे ख्रिस्टन वुल्फ सांगतात.

जर हे कृष्णविवर आपल्या आकशगंगेच्या केंद्रस्थानी असते तर आपल्याला दिसणाऱ्या पोर्मिणेच्या चंद्रापेक्षा १० पटीने अधिक प्रकाशमान दिसले असते. “हा इतका प्रकाशित तारा दिसला असता की त्यासमोर इतर तारे फिके पडले असते,” असं वुल्फ सांगतात. मात्र हे कृष्णविवर पृथ्वीजवळ असतं तर त्यामधून बाहेर पडणाऱ्या एक्स रे किरणांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला असता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fastest growing black hole in the universe eats one sun a day scsg
First published on: 06-07-2020 at 11:59 IST