सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल होण्यामागे काही कारणंच नसतं असं कितीही म्हटलं तरीही त्यामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. मुळात व्हायरल होण्याचं हे प्रकरण म्हणजे गंभीर चर्चेचा विषय. पण, या सर्व गोष्टी एकिकडे आणि एखादी गोष्ट बऱ्याच वर्षांनंतर व्हायरल होत सर्वांच्या नजरेत येणं दुसरीकडे. सध्या सोशल मीडियावर याचं एक सुरेख उदाहरणही पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नाही म्हटलं तरीही बॉलिवूडप्रमाणे बराच मेलोड्रामाही पाहायला मिळाला. मग ते एखाद्या चाहत्याचं मैदानावर धावत येऊन आपल्या आवडत्या क्रिकेटरच्या पाया पडणं असो किंवा मैदानावरच एखाद्या खेळाडूचा अफातून नृत्याविष्कार असो. क्रिकेटच्या या रंजक गोष्टींच्या खजान्यातील असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं आणि क्रीडारसिकांचं लक्ष वेधत आहे. जहीर खानला भर मैदानात फ्लाइंग किस देणाऱ्या त्या चाहतीचा व्हिडिओ अनेकांच्याच स्मरणात असावा. जो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण, तो चर्चेत येण्याचं कारण, निमित्त मात्र कळलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००५ मध्ये बंगळुरु येथे भारत- पाकिस्तानदरम्यान खेळल्या गेलेल्या टीव्हीएस चषकादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये सामना सुरु असतानाच कॅमेरामनची नजर जहीरच्या एका चाहतीवर गेली होती. जिने हातात ‘आय लव्ह यू’ जहीर असं लिहिलेली पाटी घेतली होती. तिच्यावर कॅमेरा गेल्याचं लक्षात येताच मैदानातील सर्वच क्रिकेटप्रेमींनी कल्ला करण्यास सुरुवात केली होती.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

प्रेक्षकांमध्ये सुरु असणारा हा संपूर्ण कल्ला खऱ्या अर्थाने तो सामना अधिक रंजक करुन गेला. मुख्य म्हणजे त्या चाहतीवर कॅमेऱ्याची नजर जाताच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही खेळाडूंनी जहीरची खोड काढण्यास सुरुवात केली होती. यामध्ये सर्वात पुढे होता तो म्हणजे युवराज सिंग. युवराज वारंवार जहीरला त्या चाहतीवरुन सतावत होता, त्याची मस्करी करत होता. बरं त्या चाहतीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. अखेर जहीरनेही तिच्या फ्लाइंग किसचं उत्तर फ्लाइंग किसनेच देत जणू तिचे आभार मानले. जहीरचा हा अंदाज पाहिल्यानंतर त्या वेळी चालू सामन्यादरम्यान चाहत्यांचा एकच कल्ला पाहायला मिळाला होता. या संपूर्ण प्रसंगाचं धम्माल समालोचनही केलं गेल्याचं पाहायला मिळालं. असा हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आहे. जहीरची ती चाहती जर आता तो व्हिडिओ पाहत असेल तर तीसुद्धा या आठवणींमध्ये रमली असणार यात शंका नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This old video of indian cricketer yuvraj singh teasing zaheer khan is going viral again
First published on: 25-04-2018 at 16:28 IST