नोएडा येथे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेले ट्विन टॉवर्स काल स्फोटकांच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आले. हे टॉवर्स ‘सुपरटेक’ या कंपनीच्या मालकीचे होते. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे टॉवर्स प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. यासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला. हे ट्विन टॉवर्स ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पाचा भाग होते. या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स होते. आठ लाख चौरस फुटांवर या टॉवर्सचं बांधकाम करण्यात आलं होतं. या कारवाईमुळे या कंपनीचे तब्बल ५०० कोटींचे नुकसान झाले आहे.

नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्यापूर्वी, एमराल्ड कोर्ट हाऊसिंग सोसायटीच्या ‘स्पेशल टास्क फोर्स’ने एका महिन्यापूर्वी या योजनेचा भाग म्हणून सोसायटीतील सर्व सदस्यांना बाहेर काढले होते. शुक्रवारपासूनच सोसायटीतील रहिवासी बाहेर पडू लागले. वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हे बेकायदेशीरपणे बांधलेले टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. एमराल्ड कोर्टमध्ये १५ निवासी टॉवर आहेत आणि प्रत्येक टॉवरमध्ये ४४ अपार्टमेंट आहेत.

सकाळी ७ वाजता, सोसायटीच्या विशेष टास्क फोर्सने सुनियोजित प्रयत्नांचा एक भाग म्हणून लहान मुले आणि वृद्धांसह जवळजवळ १५ निवासी टॉवर रिकामे केले होते. एमराल्ड कोर्टचे गौरव मेहरोत्रा ​​यांनी टास्क फोर्सचे नेतृत्व केले.

Twin Towers demolition: जमीनदोस्त ट्विन टॉवर्समुळे ‘सुपरटेक’ कंपनीचं ५०० कोटींचं नुकसान, पाडकामासाठी २० कोटींचा खर्च

तथापि, सकाळी ७ वाजण्याच्या आधी एका सुरक्षा रक्षकाने टॉवरच्या वरच्या मजल्यावर एक माणूस राहिला असल्याची माहिती विशेष टास्क फोर्सला दिली. विशेष टास्क फोर्सचे सदस्य नरेश केशवानी यांनी पीटीआयला सांगितले की, “टॉवर रिकामे करण्याच्या दुहेरी पडताळणी प्रक्रियेमुळे आम्हाला हे कळले. ही एक व्यक्ती सोडून बाकी सर्व लोक टॉवरमधून बाहेर पडले होते. ही व्यक्ती आपल्या अपार्टमेंटमध्ये शांतपणे झोपली होती आणि टॉवर रिकामा करण्याची मुदत त्यांच्या मनातून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.”

केशवानी पुढे म्हणाले, “कसे तरी सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना जागे केले आणि संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांना टॉवरमधून बाहेर काढण्यात आले. या दुहेरी पडताळणी प्रक्रियेमुळे, झोपलेल्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य झाले आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.”