उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे एक अजब प्रकार घडला आहे. डॉक्टर असलेल्या एका पतीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दोन पुरुषांसह नको त्या परिस्थितीत रंगेहात पकडल्यानंतर एकच गजहब उडाला. पतीने पत्नीसह दोन्ही पुरुषांना जोरदार मारहाण केली, हा पूर्ण प्रसंग यावेळी चित्रीत करण्यात आला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार पतीने पत्नीवर संशय येत असल्यामुळे तिचा पाठलाग केला होता. पत्नी एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर पतीने तिचा माग काढला. तेव्हा हॉटेल रुमच्या बाथरूमध्ये पत्नी दोन पुरुषांसह आढळून आली.

आउटलेटने दिलेल्या बातमीनुसार, हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहे, असे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार टाळण्यासाठी दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्याबरोबरच्या दोन पुरुषांना अटक केली. तसेच दोन्ही पुरुषांनी मिळून पतीच्या विरोधातही मारहाणीची तक्रार दाखल केली. मात्र पत्नीने अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार दिली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, पती आपल्या चप्पलने हॉटेल रुमच्या बाथरुमध्येच तिघांना मारहाण करत आहे. या व्हिडीओ पुढे पोलीस महिलेला बाहेर काढत असल्याचेही दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलाही सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहे. या घटनेतील एक पुरुष बुलंदशहर तर दुसरा गाझियाबादचा राहणारा आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अशाचप्रकारची एक घटना नुकतीच उजेडात आली होती. महिन्याभरापूर्वी पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड केल्यानंतर पत्नीने उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांबावर चढण्याचा प्रयत्न केला होता.