उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील एका पतीने कुटुंबातील जाणती व्यक्ती, समुपदेशक आणि पोलिसही करु शकत नाहीत असे काम करुन दाखवले आहे. बॉलिवूडमधील एका गाण्यामुळे या जोडप्याचा मोडणारा संसार वाचला. या जोडप्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. कुटुंबातील व्यक्तींनी बरेच प्रयत्न करुनही यावर कोणताही मार्ग निघत नव्हता. याविरोधात पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. नियमाप्रमाणे पोलिसांनी या जोडप्याला समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात बोलावले आणि गोष्टी वेगाने बदलत गेल्या.

आता समुपदेशनासाठी बोलावले म्हटल्यावर त्यांना भांडणांची कारणे विचारणे आणि त्यावर तोडगा काढणे हे अपेक्षित होते. मात्र, पोलिस ठाण्यात या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले. चित्रपटात शोभेल असा प्रसंग येथे घडला. समुपदेशकांनी समजवल्यानंतरही पत्नी आपल्या निर्णयावर ठाम होती. तेव्हा पतीने पोलीस ठाण्यात गाणे गायला सुरूवात केली. ‘बदलापूर’ चित्रपटातील आतिफ असलम याचे ‘ना सिखा जीना तेरे बिना’ हे गाणे गाण्यास त्याने सुरुवात केली आणि सर्व वातावरणच पालटले.

पोलीस ठाण्यातील सगळे त्याच्या अशाप्रकारे अचानक गाण्याने काही वेळ चकीत झाले, पण नंतर त्यांनाही परिस्थितीचा अंदाज आला. त्याच्या या कृतीमुळे पत्नीचा त्याच्याबद्दलचा राग कुठच्या कुठे पळून गेला. पतीने गाण्यातून केलेली विनवणी ऐकून ती त्याच्या गळ्यात पडून रडलीही. यामुळे पत्नीने त्याच्याबद्दलची केवळ तक्रारच मागे घेतली नाही तर ती त्याच्यासोबतच राहण्यास तयार झाली. त्याने म्हटलेल्या गाण्याचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी मधुर वेर्मा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर बऱ्याच प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.