Mukesh Ambani Video Viral: लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्यातील मतदानासाठी मुकेश आणि नीता अंबानी हे त्यांचा मोठा मुलगा आकाशसह मतदान करण्यासाठी मुंबईच्या मतदान केंद्रावर पोहोचले होते. कर्तव्य बजावण्यासाठी अगदी सामान्य माणसाप्रमाणे पेहराव करून अंबानी कुटुंब बूथमध्ये प्रवेश करताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालं होतं. मतदानाच्या पूर्वी व नंतर त्यांचे काही व्हिडीओ ANI सहित अनेक मीडिया संस्थांनी शेअर केले होते. यामध्ये एक लहानसा तपशील मात्र काहींच्या नजरेतून सुटला होता. तो म्हणजे अंबानींनी मतदार ओळखपत्र आणण्यासाठी वापरलेली गोष्ट. ती गोष्ट काय व अंबानींनी मतदार राजाला नेमका काय सल्ला दिला हे आपण आता पाहुया..

मलबार हिल मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर नीता अंबानी यांनी नागरिकांना आवाहन केले की प्रत्येकाने देशासाठी काही तरी करायला हवे आणि त्याची सुरुवात मतदान करण्यापासून करता येऊ शकते. एक भारतीय नागरिक म्हणून मतदान करणे महत्त्वाचे आहे. मतदान करणे हा आपला हक्क आणि जबाबदारी आहे. मी भारतातील प्रत्येकाला आवाहन करते की घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा.” तर मुकेश अंबांनी यांनी मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले होते.

दरम्यान, अंबानींच्या या व्हिडीओमध्ये एक गोष्ट नेटकऱ्यांना फार भावून गेली ती म्हणजे अंबांनी यांनी अगदी आपल्यासारखीच महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी खास पिशवी आणली होती. पॉलिथिनच्या पिशवीत अंबानींनी आपले मतदार ओळखपत्र ठेवले होते. एका तीक्ष्ण नजरेच्या चाहत्याने हे पाहिले आणि त्यांच्या साधेपणाबद्दल पोस्ट करून हा व्हिडीओ व्हायरल केला. अर्थात या व्हिडीओवरून अंबानी कुटुंबाने कुणाला मत दिले असेल याचेही अंदाज अनेकांनी बांधले होते.

दरम्यान, फक्त मुकेश अंबानीच नव्हे तर त्यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी सुद्धा आज मतदान करण्यासाठी मुंबईच्या मतदान केंद्रावर अगदी साध्या कपड्यात पोहोचले होते. चुरगळलेल्या निळ्या शर्टात अनिल हे मतदान केंद्रावर अन्य सामान्य मतदारांशी गप्पा मारताना दिसले.

हे ही वाचा<< नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा

माहितीसाठी- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. हा राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा होता. मुंबईशिवाय धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी आणि ठाणे या मतदारसंघांसाठी मतदान सुद्धा २० मे ला पार पडले होते. या शेवटच्या टप्यातील मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरु झाली होती.