आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे. व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. मात्र वाढते शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येमुळे मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळेच वाघ, बिबट्या यासारखे प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरल्याच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात. मात्र आजच्या व्याघ्र दिनाच्या तीन दिवसआधीच उत्तर प्रदेशमधील जमावाने एका वाघिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावकऱ्यांनी या वाघिणीला ठार मारतानाचे चित्रिकरणही केले आहे.
पिलभीत जिल्ह्यातील एका गावामध्ये जमावाने एका वाघिणीवर लाठी-काढ्यांनी हल्ला करुन तिची हत्या केली. लखनौपासून २४० किलोमीटरवर असणाऱ्या मतीना गावात ही घटना घडल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या वाघिणीने गावकऱ्यांवर हल्ला केल्याने त्यांनी वाघिणीला ठार केल्याचा दावा या केला जात आहे. वाघिणीने गुरुवारी सकाळी केलेल्या हल्ल्यामध्ये नऊ गावकरी जखमी झाल्यानंतर संतप्त जमावाने वाघिणीवर लाढ्यांनी हल्ला करुन तिला ठार केल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे. २ मिनीट २० सेकंदाचा मोबाइलवर शूट करण्यात आलेला व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकूण ४३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी १२ जणांची ओळख पटली असून इतर ३१ जणांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सर्वच्या सर्व ४३ आरोपींविरोधात प्राण्यांविरुद्धचा हिंसाचार आणि संरक्षण १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच वर्षाच्या या वाघिणीचे शवविच्छेदन झाल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी तिचा मृतदेह दफन केला. या वाघिणीचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरने वाघिणीला जबरदस्त मार लागल्याची माहिती दिली. ‘या वाघिणीच्या बरगड्या तुटल्या होत्या. त्यापैकी चार बरगड्या तिच्या फुफुसांमध्ये शिरल्या होत्या. तिच्या पायाची हाडंही मोडली होती. तिच्या संपूर्ण अंगावर भाले आणि टोकदार हत्यारांनी झालेल्या जखमांचे निशाण होते,’ अशी माहिती या डॉक्टरांनी दिली आहे.
वाघिणीवर गावकऱ्यांनी हल्ला केल्यानंतर तीन तासांनी वनअधिकाऱ्यांचा एक गट गावात दाखल झाला होता अशी माहिती पिलभीत येथील व्याघ्र प्रकल्पाचे कार्यकारी संचालक राजा मोहन यांनी दिली. ‘वनअधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत ही वाघीण जंगलात निघून गेली होती. तिच्यावर उपचार कऱण्यासाठी तिचा बराच शोध घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. मात्र ती सापडली नाही,’ असं मोहन यांनी सांगितले.
Warning : this is disturbing content . A 5 year old adult tigress was beaten to death by villagers in UP’s #Pilibhit on thursday afternoon . In this mobile video shot by a villager , there ‘s even background commentary on why they are killing the tigress ! Really sad ! pic.twitter.com/FY7ToT3TGA
— Alok Pandey (@alok_pandey) July 26, 2019
जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांनी वनअधिकाऱ्यांनी जखमी वाघिणीला योग्य उपचार मिळण्यासंदर्भात सर्व उपाययोजना केल्या होत्या का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वाघिणीला एवढा मार लागलेला की तिला बेशुद्ध करण्यासाठी औषधही देता येणे शक्य नव्हते अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.