पाकिस्तानमध्ये जोरदार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे देशभरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटनामध्ये १३० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देशातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने जारी केलेल्या अहवालात दिली आहे. देशातील सर्वात मोठं शहर असणाऱ्या कराचीमध्ये अनेक ठिकाणी पूराचे पाणी साचले आहे. शहरातील अनेक लहान मोठ्या गल्ल्यांबरोबरच रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. मागील चार दिवस तर शहरातील अनेक भागांमध्ये वीजच नव्हती. असं असतानाच कराचीमधील एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी कराची महानगरपालिकेचे कर्मचारी चक्क झाडू मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन कराची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला सलाम केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या २६ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कराची महापालिकेचे कर्मचारी झाडू मारताना दिसत आहेत. एका वृत्तवाहिनीसाठी शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रिपोर्टर माहिती देताना दिसत आहे. “या रस्त्यावर किमान एक ते दीड फूट पाणी आहे. हे पाणी कर्मचारी एक ते दीड तासात काढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर येथील वाहतूकीला निर्माण झालेला अडथळा दूर होईल,” असं रिपोर्टर सांगत आहे. मात्र व्हिडिओमधील कर्मचारी हे केवळ कॅमेरासाठी पोज देण्याच्या उद्देशाने पाण्यातून झाडू फिरवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या कर्मचाऱ्यांना आणि कराची महापालिकेच्या कारभाराला ट्रोल केलं आहे. अनेकांनी उपहासात्मक शेरेबाजी करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. “छान… कराचीमधील रस्ते साफ करण्यासाठी कराची महानगरपालिकेचे कर्मचारी उत्तर काम करत आहे. पाकिस्तानी लष्करानंतर अनेक संकट झेलून काम करणारी कराची पालिका हा एकमेव संस्था आहे. पाकिस्तान जिंदाबाद,” असा उपहासात्मक टोला लगावत एकाने हा व्हिडिओ ट्विटवरुन शेअर केला आहे.

या व्हिडिओला एक हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. तर ५६ हजारहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.