Mumbai Restaurant Viral Video : तुमच्यापैकी अनेकांना चायनीज रेस्टॉरंटमध्ये खायला आवडतं. काही जण तर रात्री जेवत नाहीत; पण चायनीज फूड खाऊन पोट भरतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी तुम्हाला चायनीज कॉर्नर किंवा चायनीज रेस्टारंट्स पाहायला मिळतात. त्या ठिकाणी लोकांची तुफान गर्दी असते. अनेक जण ऑनलाइन ऑर्डर करतात. पण, एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतून उघड झाला आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथील मिराकी चायनीज रेस्टॉरंटमधील किळसवाण्या प्रकाराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे.
लोकांनी केली रेस्टॉरंटवर कारवाईची मागणी
दरम्यान, एका ग्राहकानं व्हिडीओ पोस्ट करीत दावा केला की, नवी मुंबईतील सानपाडामधील मिकारी चायनीज रेस्टॉरंटमधून त्याने टोफू शेजवानची ऑनलाइन ऑर्डर केली होती; पण त्याची चव अतिशय घाण लागत होती. मग त्यानं रेस्टॉरंट गाठत त्या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये प्रवेश केला. तेव्हा तिथली घाणेरडी परिस्थिती पाहून त्याला धक्काच बसला. कुजलेलं अन्न, घाणेरडं काउंटर व अस्वच्छता अशी सगळी किळसवाणी तेथील परिस्थिती होती. दरम्यान, रेस्टॉरंटमधील ही स्थिती पाहून लोकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे, अनेकांनी या रेस्टॉरंटवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत मिराकी रेस्टॉरंटनं एक निवेदन जारी करीत म्हटलं की, व्हिडीओमध्ये ग्राहकानं केलेले दावे खोटे आहेत. कोणतेही अस्वच्छतापूर्ण व्यवहार झालेले नाहीत. सत्य महत्त्वाचं आहे, आमच्या सानपाडा आउटलेटमधील एक व्हिडीओ खोट्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. तो व्हिडीओ महिनाभरापूर्वी रेस्टॉरंटमध्ये नियमित साफसफाई सुरू होती, त्या वेळचा आहे. कोणत्याही संमतीशिवाय तो बेकायदा चित्रित करण्यात आला होता. कोणताही घाणेरडा प्रकार येथे घडलेला नाही.
रेस्टॉरंटनं FSSAI च्या अन्न सुरक्षा नियमांचं पालन करीत असल्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, रेस्टॉरंटनं ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही परिस्थिती फार घाणेरडी असल्याचं म्हटलं आहे. काही जण रेस्टॉरंटमधील परिस्थिती पाहून घाबरले आहेत. काहींनी भारतातील अनेक रेस्टॉरंटमध्ये असंच अस्वच्छ किचन आढळत असल्याचं म्हटलं आहे.