हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक रोबोट आपल्यासारखं काम करताना, हॉटेलमध्ये सर्व्ह करताना, तर अनेक कंपन्यामध्ये कामगारांसाऱखं राबताना पाहिलं असेल. अलीकडेच चॅनलवर बातम्या देणारे रोबो सुद्धा पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला असा रोबोट दाखवणार आहे ज्याने तुमच्यापेक्षाही उत्तम डान्स मुव्ह्स करतोय. फक्त डान्सच नव्हे तर तो गाण्यावर लिप-सिंक सुद्धा करतोय.

आजच्या डीजेच्या युगात बँडचे दिवस निघून गेले असले तरी ८० च्या दशकात संगीत क्षेत्रात आपल्या नावाचा डंका वाजवणारे रोलिंग स्टोन्सचा उत्कृष्ट क्लासिक रॉक बँडची आजही आठवण काढली जाते. या बॅंडच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक ‘स्टार्ट मी अप’ या गाण्याने त्या काळी धुरळा उडवला होता. १९८१ साली रिलीज झालेलं द रोलिंग स्टोन्सचं गाजलेलं गाणं ‘स्टार्ट मी अप’ हे आजच्या २१ व्या शतकात पुन्हा एकदा भेटीला येईल, याची कल्पना कुणी केली नव्हती. होय, हे खरंय. ८० व्या शतकातलं हे गाणं पुन्हा एकदा २१ व्या शतकात रोबोटिक रूप धारण करून प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यामध्ये मिक जॅगरच्या आयकॉनिक मूव्ह्ससारखे अगदी हूबेहुब डान्स मूव्ह्स करणाऱ्या रोबोट्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इंग्लिश रॉक बँडचे चाहते आश्चर्यचकित होताना दिसून येत आहेत.

हा व्हिडिओ ‘टॅटू यू’ अल्बमच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त रोलिंग स्टोन्स बँड आणि रोबोटिक्स कंपनी बोस्टन डायनॅमिक्स यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलाय. बोस्टन डायनॅमिक्स ही एक अमेरिकी इंजीनिअरिंग आणि रोबोटिक्स डिझाइन कंपनी आहे. या कंपनीचा रोबोडॉग SPOT हा २०२० मध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा रोबोट कुत्रा करोना काळात सिंगापूर पार्कमध्ये आलेल्या पाहुण्यांना सुरक्षित अंतर राखण्यासाठी विनम्रपणे सांगताना दिसून आला, त्यावेळी तो बरीच चर्चेत आला होता. COVID-19 महामारी काळात लोकांनी पाहिलेल्या अनेक विचित्र घटनांपैकी ही एक घटना होती.

तेव्हापासून बोस्टन डायनॅमिक्स ही रोबोटिक्स डिझाइन कंपनी लोकप्रिय ‘रोबोडॉग’ आणि इतर मशीन्ससाठी चर्चेत येत आहे. २०२० च्या अखेरीस जेव्हा रोबोडॉग आणखी तीन बोस्टन डायनॅमिक्स रोबोट्ससोबत ‘डू यू लव्ह मी’ गाणं गाताना दिसले तेव्हा तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर बोस्टन डायनॅमिक्सने सोशल मीडियावर आणखी एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये संगीत क्षेत्राच्या इतिहासातील महान बँडपैकी एक रोलिंग स्टोन्सचं गाजलेलं गाणं ‘स्टार्ट मी अप’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन भागांमध्ये हा व्हिडीओ दाखवण्यात आलाय. एका बाजुला बँडचं मूळ गाणं असून त्यातले कलाकार अप्रतमि डान्स करत आहेत. तर उजवीकडे याच गाण्याची नक्कल करणारे रोबोट अगदी हुबेहुब डान्स मुव्ह्स करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहून जगभरातील क्लासिक रॉक चाहत्यांसाठी मुळ कलाकार आणि रोबोट्स यांच्यामध्ये फरक करणं अवघड जात आहे. या व्हिडीओमध्ये रोबोट ‘स्पॉट’ मिक जॅगरच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसून येतोय. केवळ डान्सच नव्हे तर रोबोटने या गाण्यावर लिप-सिंक देखील केलंय. त्यांच्या हालचाली या संपूर्णपणे मानवासारख्या दिसून येत आहेत. त्यामुळं आता भविष्यात डान्ससाठी माणसाऐवजी रोबोचा वापर होण्याची देखील शक्यता आहे. आम्ही जे सांगत आहोत, त्यावर तुम्हाला विश्वास ठेवणं अवघड जाईल, त्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहाच.

Boston Dynamics कंपनीने ‘टॅटू यू’ या अल्बमला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रोबोडॉगकडून ट्रिब्यूट देणारं हे गाणं त्यांच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला होता. अवघ्या तीन दिवसात या व्हिडीओला ९,७८,३२० इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने हे रोबो डान्स करत आहे हे पाहून ते जणू मानवाप्रमाणेच डान्स करत असल्याचे अनेकांना भास होताना दिसून येत आहे. त्यामुळं आता चित्रपटासाठी भविष्यात डान्ससाठी माणसाऐवजी रोबो दिसले तर जास्त आश्चर्य वाटू घेऊ नका.