ऑनलाईन व्यवहार सुरु झाल्यानंतर दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींची ऑनलाईन खरेदी सुरु झाली. मग आपल्याला काही खायची इच्छा झाल्यावर थेट हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. कारण आता घरबसल्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपण हवे ते आणि हव्या त्या हॉटेलमधून थेट घरी मागवू शकतो. मग आपण मागवलेल्या पदार्थाची डिलिव्हरी घेऊन हे लोक आपल्या दारात येतातही. पण अशीच आपण मागवलेल्या एखाद्या पदार्थाची डिलिव्हरी देणाऱ्या मुलाने त्या ऑर्डरमधील पदार्थ खाल्ल्याचे तुम्ही कधी ऐकलंय? हो असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या ऑर्डरमधील पदार्थ खाल्ला. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली. घराच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना टिपली गेल्याने या डिलिव्हरी बॉयने केलेला प्रताप उघड झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उबरने नुकतेच आपले UberEats हे अॅप्लिकेशन सुरु केले आहे. यावरुन ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील एडी नावाच्या एका व्यक्तीने पदार्थ मागवले. आपली डिलिव्हरी आल्यावर मागवलेला पदार्थ कमी असल्याचे त्या व्यक्तीला जाणवले. आपण UberEats मधून काही मागवल्यास आधीही आपल्यासोबत असे झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. असे झाल्याने त्याने आपल्या घराबाहेरचे सीसीटीव्ही तपासून पाहिले. तेव्हा डिलिव्हरी देण्यासाठी आलेला व्यक्ती बॅगमध्ये असलेला पदार्थ काढून खात असल्याचे त्यामध्ये दिसले. अशाप्रकारे डिलिव्हरी बॉय ऑर्डरमधील पदार्थ खाणे ही अतिशय आश्चर्यकारक असल्याचे मत या व्यक्तीने व्यक्त केले. फ्रेंच फ्राईजसारखे दिसणारे काहीतरी तो खात असल्याचे यामध्ये दिसत आहे. ऑनलाईन पद्धतीने एखादी गोष्ट खरेदी करत असताना कंपनीवरील विश्वासामुळे आपण ती घेत असतो. मात्र त्यात सेवा देताना असे काही घडणार असेल तर ग्राहक कंपनीकडे पाठ फिरवायला कमी करणार नाहीत. त्यामुळे कंपनीचेच मोठे नुकसान होईल हेही नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch ubereats delivery man caught on camera stealing food of customer
First published on: 04-10-2018 at 12:36 IST