कोणतीही कला असो, तिचा तुम्ही जितका आदर कराल ती तितकीच तुम्हाला फळेल, मोठं करेल असं अनेकजण म्हणतात. अनेकदा या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण, अशी काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की, जेव्हा खरंच कला ही कोणालाही प्रकाशझोतात आणूच शकते याची प्रचिती आपल्याला येते. सध्याच्या घडीला सोशल मीडिया या साऱ्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ज्यामुळे एक रंगकाम करणारा पाकिस्तानी युवक सध्या सर्वांचच लक्ष वेधत आहे.

रंगकाम करता करता विरंगुळा म्हणून तो ज्या सुरेख अंदाजात गाणं गात आहे, ते पाहता हा युवक किती प्रतिभावान आहे, याचाच अंदाज सर्वांना येत आहे. ‘अकबर ट्विट्स’ या फेसबुक पेजवरुन त्याचे काही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मोहम्मद आरिफ ‘हमारी अधुरी कहानी’ हे गाणं गाताना दिसत आहे. कोणत्याच वाद्याची साथ नसतानाही त्या रिकाम्या खोलीत त्याचा आवाज एका वेगळ्याच अंदाजात आपल्या भेटीला येतो. सुरुवातीला आपण गात असल्याचं कोणीतरी रेकॉर्ड करत असल्याचं लक्षात येताच तो काहीसा बुजल्यासारखा वाटतो, पण त्यानंतर मात्र तो आपली ही कला तितक्याच आत्मियतेने सादर करताना दिसतो.

Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी

ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून सध्या या अफलातून कलाकाराची प्रशंसा केली जात असून, त्याचा व्हिडिओ अनेकांनीच शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला मिळणारा हा प्रतिसाद पाहून अखेर खुद्द मोहम्मदनेच नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्याला मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोबतच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आपल्याला विविध वाहिन्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून कलेची दाद दिल्याचं सांगितलं. त्यासोबतच आपली कला आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यावं अशी विनंतीही त्याने केली आहे. तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्य रंगकाम करणाऱ्याचा प्रवास खऱ्या अर्थाने लोकल ते ग्लोबल झाला, असं म्हणायला हरकत नाही.