भारतीय लग्न म्हणजे विधी, परंपरा, संस्कृती प्रदर्शनाबरोबर एक प्रकारचा कौटुंबिक आनंदसोहळाच असतो. या लग्न समारंभात काही वेळा असे किस्से घडतात, जे आयुष्यभर लक्षात राहतात. बुधवारी गुजरातच्या पाटनमध्ये लग्नाची वरात सुरु असताना, असाच किस्सा घडला, ज्यामुळे काही वेळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

पाटण जिल्ह्यातील रोडा गावात लग्नाची वरात सुरु होती. नवरदेव घोडयावर बसला होता. नवरदेवासह लग्न समारंभाला आलेली पाहुणे मंडळी सेलिब्रेशन मूडमध्ये होती. वरातीत नाचगाणे सुरु होते. पण तो गोंधळ आणि संगीताचा कर्कश आवाज घोडयाला मानवला नाही.

पाहुणे मंडळी नाचण्यामध्ये गुंग झालेली असताना, वैतागलेल्या घोडयाने चक्क वरातीतूनच पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारने सगळेच गोंधळले. नवरदेव घोडयावर असल्याने अनेकजण घोडयाला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावत होते, तर काही पाहुणे मंडळी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळत होती. घोडयाचा प्रशिक्षकही त्याला नियंत्रित करण्यासाठी मागे पळाला पण घोडा परतलाच नाही.

वरातीच्या मार्गपासून एक किलोमीटर अंतरावर नवरदेव सापडला. सुदैवाने त्याला कुठलीही गंभीर इजा झाली नव्हती. घोडयावरुन खाली पडल्यामुळे नवरदेवाला किरकोळ दुखापत झाली होती. ऐनवेळी घोडयाने अशा प्रकारे दगा दिल्यामुळे नवरदेवाला त्याच्याच लग्नात उशीर झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.