WhatsApp मेसेजेससंदर्भात कंपनीच्या इंजिनियर्स धक्कादायक खुलासा; झुकरबर्गचा दावा काढला खोडून

फेसबुकने जगभरामध्ये हजारो कर्मचारी या कामासाठी ठेवले असून त्यासाठी त्यांना मोठी रक्कम वेतन स्वरुपात दिली जात असल्याचा खुलासा एका अहवालात करण्यात आलाय.

WhatsApp Moderator
मंगळवारी प्रोपब्लिकाने एक अहवाल जाहीर केलाय ज्यात हा दावा करण्यात आलाय. (फाइल फोटो सौजन्य रॉयटर्स)

फेसबुकच्या मालकीची इनस्क्रीप्टेड मेसेजिंग सेवा देणारा व्हॉट्सअ‍ॅप हा प्लॅटफॉर्म जेवढा सुरक्षित दाखवला जातोय तेवढा सुरक्षित नाहीय. आपल्या प्रायव्हसी फीचर्ससंदर्भात सतत चर्चेत असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप या चॅटिंग अ‍ॅपसंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये युझर्सचे खासगी आणि गोपनीय संदेश वाचण्यासाठी फेसबुकने जगभरामध्ये असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांपैकी हजारो कर्मचारी या देखरेखीच्या आणि रिव्ह्यूच्या कामासाठी ठेवले असून त्यासाठी त्यांना मोठी रक्कम वेतन स्वरुपात दिली जाते. वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचं आम्ही संरक्षण करतो आणि आमच्या व्हॉट्सअ‍ॅप या प्लॅटफॉर्मवरील सर्व मेसेज इन्स्क्रीप्टेड असतात असा दावा फेसबुककडून केला जातो. मात्र नवीन अहवालामध्ये या उलट खुलासे करण्यात आलेत. एवढेच नाही तर आता कंपनीने कथित स्वरुपामध्ये कंपनीने कायदेशीर यंत्रणांसोबत ही माहिती शेअर केल्याचाही दावा या अहवालात करण्यात आलाय.

नक्की वाचा >> रतन टाटांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; पियानो वाजवतानाचा फोटो शेअर करत व्यक्त केली ‘ही’ इच्छा

झुकरबर्गने केलेला दावा

मंगळवारी प्रोपब्लिकाने एक अहवाल जाहीर केला. यामध्ये असा दावा करण्यात आलाय की व्हॉट्सअ‍ॅपच्या इन्स्क्रीप्टेड सेवेच्या माध्यमातून युझर्सकडून एकमेकांना पाठवले जाणारे मेसेज हे फेसबुक कंपनीचे कर्मचारी वाचतात. खरं तर कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे हे मेसेज पाठवणार आणि वाचणारा या दोघांमध्येच राहिले पाहिजेत. मात्र तसं होत नसल्याचा दावा प्रोपब्लिकाने केलाय. फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्गने अनेकदा कंपनी व्हॉट्सअ‍ॅपवरील युझर्सचे मेसेज वाचत नाही असा दावा केला होता. २०१८ साली अमेरिकन सिनेटसमोर मार्क झुकरबर्गने, “आम्ही एक कंपनी या नात्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्लॅटफॉर्मवरील कोणतीही माहिती वाचत नाही,” असा दावा केलेला. मात्र कंपनीच्या इंजिनियर्सने या उलट माहिती दिलीय.

कंपनीने केलं मान्य…

जेव्हा एखादी व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपवर अकाउंट सुरु करते तेव्हा तिला खासगीकरणाच्या कंपनीच्या धोरणासंदर्भात माहिती ‘अटी आणि शर्थी’अंतर्गत दाखवली जाते. मात्र प्रोपब्लिकाच्या अहवालानुसार, “व्हॉट्सअ‍ॅपकडे एक हजारहून अधिक कॉनट्रॅक्टवर असणारे कर्मचारी आहेत. हे कर्मचारी ऑस्टिन, टेक्सास, डबलिन आणि सिंगापूरच्या कंपनीच्या कार्यालायमध्ये बसून वापरकर्त्यांचे खासगी संदेश तपासून पाहतात.” ज्या कंटेटंवर आक्षेप घेतला जातो किंवा त्याबद्दल रिपोर्ट केलं जातं तो कंटेट फेसबुकचे कर्मचारी काही दिवसांसाठी रिव्ह्यूमध्ये ठेऊन तपासून पाहतात असं कंपनीने मान्य केलं आहे. अनेकदा या कंटेंटमध्ये फसवणूक, चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि दहशतवादी कारवायांसंदर्भातील माहिती असण्याची शक्यता असते असं कंपनीने म्हटलं आहे.

नक्की पाहा >> महिलांचे कपडे, खेळणी, टॅक्सी, फर्निचर, गाड्या, इंधन अन्… रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Startups मध्ये मराठमोळ्या मुलीच्या कंपनीचाही समावेश

रिपोर्ट मार्क केल्यावर काय होतं?

जेव्हा एखादी व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपवरील एखादा मेसेज रिपोर्ट करते तेव्हा तो मेसेज कंपनीने नियुक्त केलेल्या मॉडरेटर्सपर्यंत म्हणजेच देखरेख करणाऱ्यांपर्यंत पोहचतो. एखादा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरुन रिपोर्ट केल्यानंतर त्या व्यक्तीची खासगी माहिती कंपनीच्या या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचते. प्रोपब्लिकाशी बोलताना व्हॉट्सअ‍ॅपच्या इंजनियर्स आणि मॉडरेटर्सने ही प्रक्रिया कशी असते याबद्दल माहिती दिलीय. एकादा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर रिपोर्ट केल्यानंतर ज्या व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट मेसेजबद्दल आक्षेप घेण्यात आलाय तो मेसेज आणि त्या आधीचे पाच मेसेज कर्मचाऱ्यांना दिसतात. यामध्ये फोटो आणि व्हिडीओंचाही समावेश असतो. तसेच कंपनीचे कर्मचारी यूझर्सचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, प्रोफाइल पिक्चर, फोन नंबर, स्टेटस मेसेज, फोन बॅटरी किती आहे, भाषा कोणती वापरली जाते याबरोबरच फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटही पाहू शकतात.

सुरक्षा यंत्रणांसोबतही माहिती शेअर करतात

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार कंपनीकडे रोज व्हॉट्सअ‍ॅपसंदर्भातील अशा ६०० तक्रारी येतात. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक तक्रार सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका मिनिटाहून कमी वेळ मिळतो. त्यामुळेच हे मॉडरेटर्स पुढील तपासासाठी त्या विशिष्ट युझरवर नजर टेऊ शकतात किंवा त्याचं खातं बंद करु शकतात. अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षा यंत्रणांसोबत मेटाडेटा म्हणजेच अन-इनस्क्रीप्टेड रेकॉर्डस शेअर करते. यामधून वापरकर्ते इंटरनेटवर काय माहिती पाहतात यासंदर्भातील डेटा मिळतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Whatsapp moderator can read your messages propublica reveals despite facebook saying otherwise scsg