सोशल मीडियावर सध्या ‘झारा’ हा प्रसिद्ध ब्रँड जास्तच चर्चेत आला आहे. झाराचे कपडे विकत घेणा-या एका महिलेला पँटच्या शिलाईकडील भागात मृत उंदराचे अवशेष सापडले आहेत. या महिलेने आता या कंपनीविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला आहे. मॅनहॅटन येथे राहणारे ‘केली’ या २४ वर्षीय तरूणीने जुलै महिन्यात झाराच्या एका दुकानातून कपडे खरेदी केले होते. काही आठवड्यानंतर तिने हे कपडे वापरण्यात काढले. यातल्या एका कपड्यामधून तिला दुर्गंधी येत होती पण ही दुर्गंधी नेमकी कशामुळे येत आहे याची उकल तिला होत नव्हती. हे कपडे चाचपडून पाहताना तिला कपड्याच्या शिलाईमध्ये मृत उंदराचा पाय आढळून आला. तसेच यामुळे तिच्या त्वचेला देखील अॅलर्जी झाली. म्हणून तिने या जगप्रसिद्ध ब्रँडला कोर्टात खेचले आहे. १९७५ मध्ये स्पेनमधे सुरू झालेल्या या ब्रँडच्या जगभरात अनेक शाखा आहेत. महिला आणि पुरुष या दोघांसाठी हा ब्रँड कपडे बनवतो त्यामुळे नावाजलेल्या ब्रँडच्या कपड्यामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे फॅशनविश्वात याची चर्चा सुरू आहे. झाराने देखील प्रसिद्ध पत्रक काढून या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची आश्वासन दिले आहे.