Delhi Showroom Thar Crash: दिल्लीच्या निर्माण विहार येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये एक विचित्र अपघात घडला होता. नवी कोरी थार गाडी घेतल्यानंतर त्याची पुजा करताना टायरखाली लिंबू चिरडण्याची प्रथा पार पाडली जात होती. तितक्यात गाडी चालविणाऱ्या महिलेचा एक्सलेटरवर पाय पडला आणि थार गाडी पहिल्या मजल्यावरून थेट खाली पडली. यानंतर ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी या प्रकरणावरून खिल्लीही उडवली. तसेच काही माध्यमांनी गाडी चालविणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आणि इतरांना गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या चालवल्या. त्यावर आता त्या गाडीतील महिलेने स्वतः पुढे येऊन मी जिवंत असल्याचे सांगितले आहे.
थार गाडी विक घेणाऱ्या मनी पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांनी चुकीच्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच शोरूममध्ये त्यावेळी नेमके काय झाले होते, याचीही माहिती दिली. गाझियाबाद राहणाऱ्या मनी पवार यांनी मृत्यू आणि दुखापत झाल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
२७ लाख किंमत असलेल्या थार गाडीखाली लिंबू चिरडण्याचा विधी पार पाडत असताना गाडी पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली, असे सांगितले गेले होते. यानंतर मनी पवार यांनी व्हिडीओ शेअर करून पूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या, “मी तिच मुलगी आहे. जी निर्माण नगरच्या महिंद्रा शोरूममध्ये होती.”
गाडीचा आरपीएम जास्त होता म्हणून सदर अपघात घडला, असेही त्या म्हणाल्या आहेत. आम्ही सेल्समनला आधीच याबद्दल कल्पना दिली होती. मात्र काही कळण्याच्या आतच गाडीने वेग घेतला आणि क्षणार्धात गाडी कोसळली, असे त्यांनी म्हटले.
पवार पुढे म्हणाल्या की, अपघात झालेल्या मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. तिचे नाक तुटले आहे. ती मृत्यू पावली आहे. पण मी तिच मुलगी आहे, जी त्या महिंद्रा थार गाडीमध्ये बसली होती. त्यावेळी काय झाले, ते आम्हालाच माहीत. कृपया चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते.
“आम्ही गाडीत तीन जण होतो. शोरूममधील सेल्समन, मी आणि माझे पती गाडीत होते. गाडी वेगात पुढे गेली आणि पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यानंतर गाडी उलटी झाली. आम्ही आरामात गाडीच्या बाहेर आलो. आम्हाला काहीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे फक्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी लोकांना मारणे बंद करा”, असे आवाहन मनी पवार यांनी केले.
