सतराव्या शतकातील महाराष्ट्र पाहा. पुरोहितवर्गाचा कर्मठ सनातन धर्म, त्यातून फारकत घेऊन निर्माण झालेले काही पंथ, शूद्रातिशूद्रांचा बहुदेवतात्मक, जादूमंत्रादी आचारावर आधारलेला आदिम धर्म आणि या सर्वाना आव्हान देत उभा राहिलेला आक्रमक इस्लाम असे तेव्हाचे धार्मिक वातावरण आहे. गोव्यात तोवर ख्रिस्ती धर्माने बस्तान बसविले होते. परंतु त्याची झळ अजून उर्वरित महाराष्ट्रीय भूभागास लागलेली दिसत नाही. सुफी संत आणि मुस्लीम सत्ताधीश यांमुळे मात्र हिंदू धर्मापुढे चांगलेच आव्हान उभे ठाकले होते. तेव्हाच्या हिंदू धर्माची, समाजाची अवस्था काय होती? तुकोबा सांगतात-

‘ऐसें कलियुगाच्या मुळें। झाले धर्माचें वाटोळें।

Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

सांडूनिया रामराम। ब्राह्मण म्हणती दोम दोम।।

शिवों नये ती निळीं। वस्त्रें पांघरती काळीं।

तुका म्हणे वृत्ति। सांडूनि गदा मागत जाती।।’

धर्माचे वाटोळे झाले म्हणजे काय झाले, तर ब्राह्मण दावलमलकाचा- म्हणजे फकिराचा वेश घेऊन दोम-दोम म्हणून भीक मागू लागले आहेत. ज्यांना स्पर्शही करू नये अशी काळी-निळी वस्त्रे पांघरत आहेत. महानुभाव पंथाचा स्वीकार करीत आहेत. वृत्ती सांडून गदा मागत आहेत- म्हणजे ओले अन्न वा धान्य मागून आणत आहेत. भीक मागत आहेत. ते कशासाठी? तर कंदुरीसाठी. पण हे एवढेच नाही. ‘गुरुमार्गामुळें भ्रष्ट झाले सकळ’ हेही तुकोबांचे निरीक्षण आहे. हा गुरुमार्ग म्हणजे शाक्तांचा मार्ग. समाजाचे पुढारपण करणाऱ्या वर्गाचे सामाजिक चारित्र्य असे बिघडत चालले होते आणि शूद्रातिशूद्र बहुजन समाज शेंदऱ्या हेंदऱ्या क्षुद्र देवतांच्या पूजेत रमलेला होता.. ‘सेंदराचे दैवत केलें। नवस बोले तयासी।।’ हाच त्याचा धर्म उरला होता. ‘सेंदरीहेंदरी दैवतें। कोण तीं पूजी भूतेंखेतें।। आपुल्या पोटा जीं रडतें। मागती शितें अवदान।।’ अशा दैवतांची पूजा कशासाठी करावी, हा तुकोबांचा सवाल आहे. पण सर्वत्र तेच केले जात होते. हा जो शूद्रातिशूद्रांचा बहुदेवतात्मक धर्म आहे, तो केवळ तुकोबांनी नव्हे, तर सर्वच वारकरी संतांनी सातत्याने धिक्कारला आहे. याचे साधे कारण म्हणजे वारकरी संतमंडळींचे- साम्यवादी भाषेत सांगायचे तर- वर्गचरित्र. ते प्रामुख्याने अलुतेदार-बलुतेदारांचे आहे. बहुतेक संत हे याच वर्गातून आलेले आहेत. आणि ते ज्या समाजव्यवस्थेचे भाग आहेत, ती या धर्मामुळे मोडकळीस आलेली आहे. ती इमारत पुन्हा उभारायची असेल तर त्या व्यवस्थेतील कमअस्सल ते बाजूला सारणे आवश्यक होते. धर्माचा ‘खोटा उदीम’ बंद करणे आवश्यक होते. विविध दैवतांच्या पूजा-उपासनेतून सामाजिक शक्ती आणि नैतिकतेचा होणारा ऱ्हास थांबविणे गरजेचे होते. तुकोबांनी त्यासाठीच शब्दांची शस्त्रे परजली होती. ते म्हणतात-

‘नव्हे जाखाई जोखाई। मायाराणी मेसाबाई।।

बळिया माझा पंढरीराव। जो ह्य़ा देवांचाही देव।।

रंडी चंडी शक्ती। मद्यमांस भक्षिती।।

बहिरव खंडेराव। रोटी सुटीसाठी देव।।

गणोबा विक्राळ। लाडुमोदकांचा काळ।।

मुंजा म्हैसासुरें। हें तों कोण लेखी पोरें।

वेताळें फेताळें। जळो त्यांचें तोंड काळें।।’

जाखाई, जोखाई, रंडी, चंडी अशा शूद्र देवतांचा तर ते धिक्कार करतातच; परंतु खंडोबा, बहिरोबा या अनेकांच्या कुलदेवतांनाही त्यांनी तुच्छले आहे. ते भरीत आणि रोडग्याचे देव आहेत, अशा शब्दांत त्यांचे स्थान दर्शविले आहे. गणपती ही लोकप्रिय देवता. देहूजवळच चिंचवडला गणेशाचे महत्त्वाचे मंदिर आहे. तेथे मोरया (मोरोबा) गोसावी यांची समाधी आहे. ते तुकोबांचे समकालीन. थोर गणेशभक्त. त्यांना गणेशाचा अवतार मानले जाते. त्यांची आणि तुकोबांची भेट झाल्याचेही दाखले आहेत. असे असतानाही तुकोबांनी गणपतीची ‘लाडू-मोदकांचा काळ’ अशी संभावना केलेली आहे. गणपतीच्या तांत्रिकांशी असलेल्या संबंधामुळे ते असे म्हणत आहेत, हे निश्चित. गाथेत तंत्रवादी शाक्तांवर १३ अभंग आहेत. त्यातील एका अभंगात शाक्तांना ‘मनुष्य परी कुतरी ती’ असे संबोधून ते पुढे म्हणतात- ‘पूजिती विकट दोंद। पशु सोंड गजाची।।’  हे गणपतीचे वर्णन आहे.

एकंदरच तुकोबांचा शाक्तांवर प्रचंड राग आहे. ‘शाक्ताची सूकरी माय। विष्ठा खाय बिदीची।।’, ‘शाक्ताची गाढवी माय। भुंकत जाय वेसदारा।।’ अशा शिव्याच घालतात ते त्यांना. ते म्हणतात, हा ‘शाक्त गधडा जये देशीं। तेथें राशी पापाच्या।।’ असतात. ‘शाक्त वास करिती तो’ देश, तेथील राजा, प्रजा यांचे ‘द्वाड’च होते. ते एवढे चिडून, संतापून बोलतात याचे कारण त्या पंथाच्या स्वरूपात दडलेले आहे. हा तसा जुनाच पंथ. गुप्तोत्तर काळात उदयाला आलेला. तो एवढा लोकप्रिय होता, की हिंदू धर्मातील महत्त्वाच्या पाच- वैष्णव, शैव, शाक्त, सौर आणि गाणपत्य- या संप्रदायांत त्याचा समावेश आहे. याच्या उपासना- विधीमध्ये पाच म-कारांना महत्त्व असते. ते म्हणजे-मत्स्य, मांस, मुद्रा, मद्य आणि मैथुन. धर्माच्या नावाने व्यभिचाराचा मिळालेला खुला परवानाच तो! तुकोबा त्याविरोधात ज्या पोटतिडिकेने आणि चिडीने बोलतात, ते पाहता त्या काळात महाराष्ट्रात हा संप्रदाय चांगलाच बोकाळला होता असे दिसते. तुकोबा सांगत आहेतच की- ‘गुरुमार्गामुळें भ्रष्ट झाले सकळ।’

‘डोहोर लोहार दासी बलुती बारा।

उपदेशिती फारा रांडापोरें।।’

हे शाक्त ढोर, लोहार आदी बारा बलुतेदारांना, त्यांच्या बायका-पोरांना उपदेश करतातच, पण-

‘कांही टाण्या टोंण्या विप्र शिष्य होती।

उघडी फजिती स्वधर्माची।।’

त्यांच्या मंत्र-तंत्राच्या लालचेने ब्राह्मणही

त्यांचे शिष्य होऊन आपल्याच धर्माची फजिती करतात. हे शाक्त-

‘नसता करूनि होम खातीं एके ठायीं।

म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें।।

इंद्रियांचे पेटे भला कौल देती।

मर्यादा जकाती माफ केली।।’

खोटाच एखादा होम करून, एकत्र बसून खातात आणि वर सांगतात की, यात काहीही पाप नाही. मोक्षच आहे. मर्यादारूपी जकातीची माफी देऊन इंद्रिय व्यवहारांत चांगलीच मोकळीक देतात. सर्वच वर्गामध्ये असा वामाचार बळावलेला असणे हे समाजाला लागलेल्या किडीचेच लक्षण. ती साफ करणे हे सोपे काम नव्हते. कारण तो नुसताच मूळ धरून नव्हता, तर प्रभावीही होता. अगदी छत्रपती शिवरायांनाही वैदिक राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी तांत्रिक पद्धतीने अभिषेक करवून घ्यावा लागला होता. यातून त्या तंत्रसांप्रदायिकांच्या प्रभावाची कल्पना यावी. अगदी शिवकालानंतरही हा संप्रदाय महाराष्ट्रात टिकून राहिल्याचे दिसते. पेशवाईत याचाच एक पंथ ‘घटकंचुकी पंथ’ या नावाने ओळखला जात होता. पुढे ओशो रजनीशांनी या ‘अध्यात्मविचारा’लाच नव्याने उजाळा दिला. आजही अनेक बाबा-बापूंच्या तंत्रलीला पाहावयास मिळतात- तो या धर्माचाच भाग.

तुकारामांभोवताली असलेल्या समाजाची नैतिक पातळी किती खालावलेली होती हेच यातून दिसते आहे. एकीकडे शूद्र दैवतांची उपासना आणि दुसरीकडे असा वामाचार. यातून आपण काही वाईट करतो आहोत, याचे भानही त्या समाजाला राहिलेले नव्हते. त्यांना हाताला धरून ‘आडमार्गाला जाऊ  नका’ असे सांगितले तरी ते ऐकत नाहीत.

‘वारितां बळें धरितां हाती।

जुलुमें जाती नरकामधीं।।

रंडीदासाप्रति कांहीं।

उपदेश तोही चालेना।।’

ही तुकारामांची खंत आहे. विशेष म्हणजे ती आजही तेवढीच ताजी आहे. आजही धर्माचा खोटा उदीम बळावलेला दिसतो. आजही बुवाबाजी माजलेली आहे. तेव्हाही ती होती. आणि तुकोबा त्याविरोधात लढत होते. कारण ‘तेणे जन नाडिलें’ हा त्यांच्या काळजीचा विषय होता..

tulsi.ambile@gmail.com