News Flash

चर्चाची गुऱ्हाळं उपयुक्त?

दिवसभरातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेवर चर्चासत्र होत असतं.

एक अँकर, पाच-सहा तज्ज्ञ, आरडाओरडा, कल्लोळ हा साधारण नऊ वाजता टीव्हीवर सुरू होणारा फड आपल्या दिनक्रमाचा भाग झाला आहे. दिवसभरातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेवर चर्चासत्र होत असतं. पण, खरंच या चर्चा उपयुक्त आहेत?

कन्हैया, पंकजाताई मुंडेंचा सेल्फी, दुष्काळ धोरण, शक्तीमान घोडा- राष्ट्रीय तसेच मराठी वृत्तवाहिन्यांवरील रात्री चालणाऱ्या चॅनेलीय चर्चाचे हे विषय. एक अँकर, पाच-सहा तज्ज्ञ, आरडाओरडा, कल्लोळ हा साधारण नऊ वाजता सुरु होणारा फड आपल्या दिनक्रमाचा भाग झाला आहे. खरंच या चर्चा उपयुक्त आहेत? चर्चा, गप्पा, परिसंवाद, परिषदा यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असते. कारण कृती झाली तरी तरच प्रक्रिया सुरू राहते. मग वातानुकूलित वातावरणात रंगणाऱ्या या गप्पा काय देतात? व्हॅल्यू अ‍ॅडिशन म्हणावं अशी भर आपल्या पोतडीत पडते का? खूप साऱ्या वाहिन्यांवरच्या चर्चा ऐकून, अभ्यासून केलेला प्रयत्न.

– दररोज सकाळी दहा ते बारा वृत्तपत्रांचा आढावा घेतल्यानंतर संध्याकाळी चर्चेचा विषय काय असू शकतात याची नोंद चॅनल मंडळी घेतात. तीन विषय शॉर्टलिस्ट केले जातात. या तीनपैकी कोणत्या विषयाचे तज्ज्ञ चर्चेच्या वेळी स्टुडिओत किंवा त्यांच्या घरी किंवा कचेरीत उपलब्ध होऊ शकतील याची चाचपणी केली जाते. प्रतिस्पर्धी वाहिन्या आपण बोलावणार असलेल्या तज्ज्ञांनाच निमंत्रण देणार हे नक्की असल्याने लवकरात लवकर तज्ज्ञांना गाठण्यासाठी व्यूहरचना आखली जाते. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज, मेल, फोन या माध्यमातून संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचता येतं. प्रत्येक जण आपल्या व्यापात असतो. त्यातून चर्चेसाठी अभ्यास करून झटपट सादर होण्यासाठी मानसिक तयारी लागते. सगळ्यांची अशी तयारी असते असं नाही. मग अशा व्यक्तींना प्रोत्साहन द्यावं लागतं. तुम्ही बोलू शकाल हा आत्मविश्वास पेरावा लागतो. बरं ही व्यक्ती मुंबईत असेल तर उत्तम. कारण वाहिन्यांची कार्यालयं मुंबईत आहेत. सोडा आणायला गाडी पाठवलं की काम सोपं होतं. पण व्यक्ती मुंबईबाहेरची असेल तर अन्य ब्युरो अर्थात जिल्हास्तरावरच्या कार्यालयात त्या माणसाला वेळेत आणणं ही कसरत असते. ट्रॅफिकजॅम आपल्या पाचवीलाच पुजलेला असल्याने व्यक्ती स्टुडिओत दाखल होईपर्यंत चर्चेच्या कार्यक्रमाचा निर्मात्याचा जीव अर्धामुर्धा होतो. हे सगळं पडद्यामागे आणि पडद्याआधीची धावपळ.

– अनेकदा वृत्तपत्रांना आणि वृत्तवाहिन्यांना बातम्यांची टंचाई जाणवते. आहेत त्या बातम्यांना मोठं करून जागा भरो किंवा स्लॉट भरो आंदोलन हाती घ्यावं लागतं. पाण्याचा दुष्काळ, सहिष्णुतेचा दुष्काळ तसंच विषयांचा दुष्काळ. त्यातही वाहिन्यांसाठीच्या खपाचे मुद्दे मर्यादित असतात. त्यांना सनसनाटी लागतं. शहरात चंगळवादी लाइफस्टाइल असणाऱ्यांना दूर खेडय़ातल्या गोष्टींवर चर्चा ऐकवणं टीआरपीच्या दृष्टीने हिताचं नाही. खेळांसंदर्भात अनेक वेळा चर्चा घडू शकते, मात्र असंख्य प्रेक्षकांना खेळांची अ‍ॅलर्जी असते. एवढी अ‍ॅलर्जी की ही मंडळी जेमतेम सचिन तेंडुलकरला ओळखतात. बाकी खेळ आणि खेळाडूंबद्दल काय स्थिती असेल तुमच्या लक्षात येईल. एका गटाला इंटलेक्च्युअल वाटणारा विषय दुसऱ्या गटाला तुपाशी गटाचे रिकामपणचे धंदे वाटू शकतो. काही विषय विशिष्ट समाजातल्या एका गटाला आदरस्थानी असतात तर दुसरा गट त्यांचा उद्धार करतो. जातपात, धर्म, पंथ, प्रदेश, प्रांत, आवडीनिवडी, टार्गेट ऑडियन्स, चॅनेलची पॉलिसी या सगळ्या निकषांचा विचार करून दररोज रात्री चर्चा उभी करणे खंडप्राय आव्हान आहे. पण वैचारिक मंथन ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. या उक्तीला अनुसरून चर्चा घडवल्या जातात.

– एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असलेल्या व्यक्तींना व्यासंगी म्हटले जाते. अशा व्यक्ती चर्चासत्रात येणे अपेक्षित असते. प्रसिद्धीचा हव्यास न धरता अशा व्यक्ती आपले काम नेटाने करीत असतात. पण गेल्या सात-आठ वर्षांत चॅनेलीय चर्चाचे पेव फुटल्यापासून स्वयंघोषित तज्ज्ञांची संख्या वाढू लागली आहे. काही जणांनी सीव्हीवर अर्थात परिचय पत्रात विविध वाहिन्यांवरच्या चर्चासत्रात तज्ज्ञ म्हणून उपस्थिती असं नमूद करायला सुरुवात केली आहे. सलमान खानला निर्दोष सोडण्यापासून कन्हैयाच्या घोषणाबाजीपर्यंत- विषय काहीही असो. काही तज्ज्ञ कायम असतात. अगदी निवासीच म्हणा ना. विषय कळण्याची खोटी. त्यांचा अभ्यास रेडी असतो. साधारण माणूस बोलायला लागला की तो किती पाण्यात आहे याची कल्पना येते. वाहिन्यांच्या चर्चा याला अपवाद नाहीत. परंतु तुमचा किती व्यासंग यापेक्षा तुम्ही इतरांवर कुरघोडी करीत, मोठय़ा आवाजात दमदाटी करीत, अँकरचं वाक्य मध्येच तोडत आत्मविश्वासाने बोलू शकण्याला महत्त्व आहे. दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा, त्याला बोलूच द्यायचं नाही हा फंडा यशस्वी तज्ज्ञ होण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. बहुसंख्य तज्ज्ञ शांतपणे मुद्दा मांडत असताना, अन्य उत्साही तज्ज्ञ त्यांना थांबवून मोठय़ाने बोलायला सुरुवात करतात. मोठा आवाज ही चित्ताकर्षक तज्ज्ञांचे पहिले लक्षण मानावे. बोलणं, वक्तृत्त्व ही कला आहे. प्रचंड ज्ञानभांडार असणारी माणसं उत्तम वक्ता असतातच असं नाही. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपले नुकसान होते. कारण अभ्यासपूर्ण विवेचनाला आपण मुकतो.

– राजकीय प्रवक्ते प्रामुख्याने चर्चामध्ये असतात. पक्षाच्या विशिष्ट व्यक्तीने घातलेला गोंधळ निस्तरणे हे काम त्यांना दिलेले असते. काही तरी वाचाळपणा करायचा आणि मग माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला किंवा संदर्भ तोडून माझं वक्तव्य दाखवलं गेलं अशी सारवासारव सहजपणे करता येते. हे प्रवक्ते सातत्याने मुख्य विषयाला बगल देतात. वारंवार इतिहासात तुम्ही असंच वागत होतात याची जाणीव समोरच्या पक्षाच्या माणसाला करून देतात. कधीही आमचं चुकलं, आम्ही या भूमिकेवर पुनर्विचार करू असं म्हणताना कोणीही आढळत नाही. एखाद्या नेत्याने शाब्दिक आगळीक केली तर ती त्याची वैयक्तिक भूमिका, पक्षाची नव्हे अशी लोणकढी थापही मारली जाते. बरं लोकशाही असल्यामुळे सगळ्या भूलथापांना सामान्य माणूस बळी पडतो. दररोज रात्री चर्चामध्ये आपण उघडे पडतोय म्हणून राजकीय पक्षांनी बोध घेऊन भूमिकेत किंवा कृतीत बदल झाल्याचं स्मरत नाही, दिसत त्याहून नाही. २४ तासांच्या वृत्तवाहिन्या रोज रात्री चर्चा घडवून आणतात. पण या चर्चामुळे घोटाळे कमी झालेत किंवा राजकीय नेत्यांच्या वर्तनात किंचित बदल झाला आहे किंवा प्रशासन अंशभर गतिमान झालं आहे असं होत नाही. शेकडो कोटींचं कर्ज घेऊन, असंख्य बँकाना फसवून किंगफिशरी राजे देशाबाहेर पसार होतात. आणि आपण बँकविषयक तज्ज्ञांचं दळण ऐकत बसतो. गोष्टी हाताबाहेर निसटून गेल्यानंतर चर्चा करण्याऐवजी आधी चर्चा झाली तर उपयुक्त ठरू शकतं.

– इंग्रजी वाहिन्यांमध्ये तर सखोल अभ्यासपूर्ण विवेचन दूर राहावे यासाठी खास प्रयत्न केले जातात. एका स्क्रीनला परिशिष्ट स्क्रीन जोडावा लागेल एवढे तज्ज्ञ बोलावले जातात. किमान दहा-बारा विंडोमध्ये माणसं असतात हल्ली. ‘नेशन वाँट्स टू नो’ असं म्हणतात पण एखादा माणूस अख्ख्या तासात फार तर चार मिनिटं बोलू शकतो. कारण एवढय़ा गर्दीत कुठे संधी मिळायला. शिरा ताणून, ब्लडप्रेशर शूट करून घेऊन मान्यवर अँकरबुवा एकेका तज्ज्ञाला फैलावर घेतात. न्यायालयात दुसऱ्या बाजूचा वकीलही असं धारेवर धरत नाही. आपल्याला एखाद्या विषयातलं कळतं म्हणजे गुन्हाच घडला जणू अशा थाटात हे अँकरबुवा अंगावर येतात. ते सगळ्यांना सवाल करतात. मासळी बाजारापेक्षा अधिक कल्लोळ उडतो. कुणाचाच पायपोस राहत नाही. सवाल, जबाब हवेत तरंगत राहतात. कोणी पुराव्याचं कागद दाखवत राहतं, कोणी बोलायला मिळावं म्हणून अंगुलीनिर्देश करतं. काही वेळेला याची परिणती मारामारीत होते. हिंसा टाळण्यासाठी हल्ली चॅनेलवाल्यांना बाऊन्सर्स लागतात असं कळलंय.

– चर्चा घडवणं नाइलाज असतो. एखादा विषय पूर्ण समेवर येईपर्यंत थांबणं आवश्यक असतं. पण तेवढा वेळ नसतो. त्या विषयाची जाण असलेली माणसंही मर्यादित असतात. अँकरलाही विषयाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. मग काय तेच तेच प्रश्नांभोवती चर्चा फिरत राहते. एकच प्रश्न फिरून वेगळ्या भाषेत विचारला जातो. चर्चा घडवणं मस्ट असल्याने कुठल्या तरी विषयाला आणि पर्यायाने मोठं करावं लागतं. कन्हैया हे त्याचं उत्तम प्रारूप. नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा हे नाव कुणाला ठाऊकही नव्हतं. आता नवजात अर्भकापासून नव्वदीच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना कन्हैया ठाऊक आहे. आठवडय़ाला तीन चर्चा त्याच्यावर रंगवाव्यात एवढा तो मोठा आहे? त्याच्यानिमित्ताने दोन राष्ट्रीय पक्षांचं आमनेसामने येणं अधोरेखित होतंय. पण ज्या कालावधीत शिक्षण पूर्ण करायचं, परीक्षा द्यायची, संशोधन करायचं त्या काळात जाहीर भाषणबाजी करायला वेळ कसा मिळतो असं कोणी चर्चेत विचारताना दिसत नाही.

– शास्त्रीय अभ्यास म्हणून नक्की करून पाहा. एखाद्या चॅनेल निवडा. रात्री नऊ ते दहा चर्चा पूर्ण ऐका. तुम्हाला कृती करण्यासाठी, बंड करण्यासाठी, व्यवस्थेविरुद्ध जाण्यासाठी प्रेरणा मिळाली का? कठीण आणि आवाक्यापलीकडचा विषय मुळातून समजला असे झाले का? अरे काय हा कचकचाट, त्यापेक्षा आयपीएलची मॅच बरी असं तुम्हाला वाटलं का? चर्चा ऐकल्यावर राजकीय पक्षांप्रति तुमचा आदर दुणावला का? चर्चा ऐकल्यावर हे बाता मारणार, आमचं जिणं आहे तसंच असं तुम्हाला वाटलं का? मी कुठल्याही विषयाचा तज्ज्ञ नाही. पण मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझीही एक बरीवाईट भूमिका आहे. बोलावता का मला चर्चेला? असं सांगावंसं वाटतं का? एखादा माणूस संतपदी पोहोचतो. तसं तज्ज्ञ होण्याची प्रक्रिया काय आहे? त्यासाठी विद्यापीठीय कोर्स आहे का? या प्रश्नांच्या उत्तरातून आपला वेळ सत्कारणी लागतोय का याची तुम्हाला कल्पना येईलच. नाही आली तर निखळ मनोरंजन म्हणून चर्चा ऐकायला हरकत नाही.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:25 am

Web Title: panel discussion on tv
Next Stories
1 ‘एक’वाक्यतेची चलती
2 चला, चला जत्रेला चला!
3 टीव्हीवरची ‘दुकानदारी’!
Just Now!
X