19 February 2020

News Flash

अध्यात्माची अशीही बैठक!

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासह टीव्हीविश्वाने अध्यात्माला आपलंसं केलं आहे.

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासह टीव्हीविश्वाने अध्यात्माला आपलंसं केलं आहे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेत त्यांना काय हवंय आणि काय नको हे जाणून घेत आध्यात्मिक वाहिन्या सज्ज झाल्या आहेत. इतर जीईसी चॅनल्सप्रमाणे आध्यात्मिक चॅनल्सचीही संख्या वाढताना दिसतेय.

प्रवचन, कीर्तन, लळीत, सत्संग, बैठक, निरूपण, पारायण या शब्दांचं गारूड आपल्या मनावर असतं. संसाराच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात वानप्रस्थाश्रमी दाखल झाल्यानंतर करण्याचे उपक्रम म्हणून या गोष्टींकडे पाहिलं जातं. आयुष्याच्या संध्याकाळी सर्वोच्च शक्तिप्रति लीन होण्याची भावना असते. या भावना आणि टीव्ही हे समीकरण थोडं विचित्र वाटतं ना! पण टीव्हीविश्वाने अध्यात्माला आपलंसं केलं आहे. कुठल्याही चांगल्या कार्यासाठी विचारांची बैठक महत्त्वाची असते. टीव्ही पाहताना एक प्रकारे आपण बैठकच घालतो. कधी खुर्चीत बसून, कधी गादीवर बसून उशीसंगे तर कधी लोळून. प्रेक्षकांना काय हवंय आणि काय पटतंय हे जाणून आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) वाहिन्यांनी जोम धरला आहे. या जोमदारपणाचा वेध.

’      विविधता हे आपले गुणवैशिष्टय़ आहे. असंख्य धर्म, जाती, उपजाती, पोटजाती, पंथ आपल्या समाजात आहेत. प्रत्येकाचे दैवत वेगवेगळे. आदरणीय व्यक्ती आणि विचार वेगवेगळे. प्रत्येक धर्माची आणि विचारप्रवाहाची पवित्र पुस्तिका वेगवेगळी. कसे जगावे आणि कसे जगू नये याचे ठोकताळेही निरनिराळे. सर्वोच्च शक्तीपर्यंत आपली प्रार्थना पोहोचण्यासाठीचा मार्ग विविध श्रवण आणि अनुसरणातून जातो. यातूनच कीर्तन, पठण, पारायण यांचा उदय झाला आहे. लोकसंस्कृतीचा तो अविभाज्य घटक आहे. अगदी आतापर्यंत हे वैयक्तिक होतं. पण टीव्हीच्या वाढत्या पसाऱ्याबरोबर एकत्रित श्रवण, पठणाला महत्त्व आलं आहे. भव्य शामियाना उभारलेला, मंचावर मुख्य गुरुजी उच्चासनावर आरूढ झालेले. आजूबाजूला भक्तगणांचा राबता, मागे कार्यक्रमाचा तपशील विशद केलेला. अत्याधुनिक अशी ध्वनियंत्रणा बसवलेली. मंचासमोर हजारोंचा जनसमुदाय ज्ञानकण वेचण्यासाठी आतुर. मंचाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जायंट स्क्रीन, जेणेकरून मागे बसलेल्या भक्तांची गैरसोय होणार नाही. साथीला एक सुसज्ज वाद्यवृंद. बरं हे सगळं त्या मैदानात जमलेल्या समुदायाइतकंच 23-chart-lpटीव्हीवर पाहणाऱ्या मंडळींसाठी महत्त्वाचं. बंद स्टुडिओतलं प्रवचन आणि अशा भव्य आणि भारावलेल्या वातावरणातलं प्रवचन यामध्ये वातावरण निर्मित्तीचा फरक पडतो. रोज सकाळी साधारण चार ते आठ या वेळेत भक्तिरसाने ओथंबलेल्या असंख्य वाहिन्या तुम्हाला पाहायला मिळतील.

’      अन्य वाहिन्यांचा उद्देश मनोरंजन असतो. यासाठी प्रामुख्याने लग्नबंबाळ केंद्रित मालिकांचा मारा ते आपल्यावर करतात. साहजिकच कल्पनाशक्तीची भरारी मर्यादित राहते. लव्ह-इश्क-प्रेम-मोहब्बत आणि पुढे जाऊन साखरपुडे आणि लग्न याभोवतीच कथानकं फिरत असल्याने विचारटंचाई जाणवते. मात्र आध्यात्मिक वाहिन्यांना हे भय नाही. कारण मनोरंजन हे त्यांचं उद्दिष्ट नाही. वास्तव जगात पामर माणसांना असंख्य अडीअडचणींना सामोरे जावे लागते. स्वमालकीची जागा घेणं, रुग्णालयातले उपचार, कौटुंबिक कलह हे मार्गी लावताना सामान्य माणूस मेटाकुटीला येतो. त्याचा रोजच्या जगण्याचा संघर्ष किंचित सुकर व्हावा यासाठी उपायदर्शन आणि मन शांत राहावे यासाठी क्लृप्त्या असं साधारण आध्यात्मिक वाहिन्यांचा दृष्टिकोन असतो. दुर्दैवाने युवा आणि मध्यवयीन मंडळी कामाच्या रामरगाडय़ात या वाहिन्या पाहतच नाहीत. रीतसर निवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले, मुलांचं शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, संसार मार्गी लागलं आहे, असे खाऊन-पिऊन सुखी पालक अशा वाहिन्या प्रामुख्याने बघतात. कमवायचं कसं आणि भागवायचं कसं या चिंतेतून ते बाहेर पडलेले असतात. सकाळी उठून घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावण्याची आता त्यांना गरज नाही. नातवंडांच्या बाललीला अनुभवायच्या, संसार ओढण्यात दुरावलेली मित्रमंडळी एकत्र आणायची, मॉर्निग वॉकच्या निमित्ताने समवयस्कांना भेटणं, सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती असा दिनक्रम असलेली असंख्य वरिष्ठ नागरिक मंडळी आध्यात्मिक वाहिन्यांचे प्रेक्षक आहेत. मुंबईसह राज्यात आणि पर्यायाने देशात असा आर्थिक आणि आरोग्यदृष्टय़ा सुस्थितीत वर्ग वाढतो आहे. यापैकी काही जणांची मुलं-मुली परदेशात असतात. त्यांना एकटेपण असते. टीव्ही त्यांचा मित्र होतो. कटकारस्थानं आणि कजाग माणसांच्या कथानकांपेक्षा कोणाचंही वाईट न चिंतणारं आणि कानाला बरं ऐकायला आणि पाहायला मिळणं त्यांना आवडतं. आध्यात्मिक वाहिन्या ही गरज पुरेपूर पूर्ण करतात.

’      वृत्तवाहिन्यांना २४ तास दुकान सुरू ठेवण्यासाठी काही तरी हाडूक लागतं. ते मिळालं की दिवसरात्र तेच चघळत बसता येतं. म्युझिक वाहिन्यांना नवनवीन चित्रपट प्रदर्शित होणं आवश्यक असतं. तरच त्यांचे ट्रेलर आणि गाणी दाखवून त्यांना प्रेक्षकांना रिझवता येतं. क्रीडा वाहिन्यांना सातत्याने स्पर्धा होणं आवश्यक असतं. संकल्पना आटण्याची भीती प्रत्येक वाहिनीला असते. विशेषत: दैनंदिन मालिकांना जास्तच. आठवडय़ाचे सहा दिवस दाखवायचं काय, मात्र आध्यात्मिक वाहिन्यांना ही समस्या अजिबातच नाही. आपली संस्कृती, धर्मग्रंथ, वचनं आणि संतसाहित्य एवढं आहे की ते संपण्याची भीतीच नाही. एकाच धर्माचे अनेक उपपंथ असतात. त्या प्रत्येकाचं साहित्य वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा सर्वोच्च शक्तीकडे पाहण्याचा आणि आपलंसं करण्याचा मार्ग वेगवेगळा. त्यामुळे काय प्रक्षेपित करायचं ही चिंता नाही. उलट काय काय प्रसारित करायचं हा अनोखा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.

’      सर्वोच्च शक्तीला आपलंसं करताना पैसा, मोह, माया यांच्यापासून दूर जायला गुरुजन सांगतात. बहुतांशी प्रवचनांचे सार तेच असतं. पण अशी प्रवचनं, निरूपणं प्रक्षेपित करणाऱ्या वाहिन्यांच्या गुंतवणकीचे आकडे डोळे दीपवून टाकणारे आहेत. भक्तिरसात न्हाऊन घालणाऱ्या वाहिन्या धर्मादाय वगैरे नाही तर रीतसर व्यावसायिक प्रारूपं आहेत हे विसरून चालणार नाही. बाबा रामदेव यांचा ब्रॅण्ड प्रस्थापित करण्याचं श्रेय आस्था वाहिनीला जातं. २००० साली सीएमएम कंपनीने ही वाहिनी सुरू केली. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने त्यांनी वाहिनी विक्रीला काढण्यासाठी २००७ मध्ये प्रक्रिया सुरू केली. याच सुमारास रामदेवबाबा आणि पर्यायाने त्यांची कंपनी प्रसारासाठी हुकमी माध्यमाच्या शोधात होती. स्वतंत्रपणे नवीन वाहिनी सुरू करण्यासाठी ५० कोटी एवढी प्रचंड रक्कम खर्च करण्याऐवजी त्यांनी १६ कोटी रुपये खर्चून ही वाहिनी विकत घेतली. रामदेवबाबांचे सहाध्यायी आचार्य बाळकृष्ण या वाहिनीचं कामकाज पाहतात. रामदेवबाबा यांचं सोपं आणि खुशखुशीत बोलणं, प्रात्यक्षिकांसह योग आणि आसनं हे प्रचंड लोकप्रिय झालं. दोनच वर्षांत या वाहिनीने जाहिरातींच्या माध्यमातून १८.५ कोटी रुपये कमावल्याचं स्पष्ट झालं. वाहिनी चालवण्यासाठीचा खर्च जेमतेम १० कोटी होता. साहजिकच वाहिनी ताब्यात घेतल्यापासून अवघ्या दोन वर्षांत निव्वळ नफा ८ कोटींपर्यंत जाणं प्रेक्षकांच्या जनाधाराचं आणि वाहिनीच्या लोकप्रियतेचं लक्षण आहे. हे केवळ एका वाहिनीचे आकडे आहेत.

’      टीएएम मीडिया रिसर्च संस्थेच्या अभ्यासानुसार भारतात ४३ आध्यात्मिक वाहिन्या आहेत. प्रति वर्षी त्यांची संख्या वाढते आहे. हमारी संस्कृती, हमारी विरासत या ब्रीदवाक्यासह चालणारी संस्कार वाहिनी तुफान लोकप्रिय आहे. रामदेवबाबांसह असंख्य गुरुजनांची प्रवचनं वाहिनीवरून प्रक्षेपित होतात. दक्षिणेतील द माता अमृतानंदमयी मठाने स्वत:ची अमृता नावाची वाहिनी स्थापन केली. २००३ मध्ये सुरू झालेली ही वाहिनी मातांच्या भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. भारतीय संस्कृतीची महती सांगणारे आणि युवा वर्गाला भावतील, असे कार्यक्रम या वाहिनीचे वैशिष्टय़ आहे. तूर्तास ही वाहिनी मल्याळम् भाषेत आहे. पण लवकरच अन्य भाषेत प्रक्षेपण सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आध्यात्मिक क्षेत्राची ताकद लक्षात घेऊन झी समूहाने झी जागरण नावाची वाहिनी सुरू केली. तिलाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. गावोगावी, शहरात होणारे सत्संगरूपी कार्यक्रम, प्रवचनं हे भक्तांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहेच. पण त्याला मर्यादा आहेत. घरापासूनचं अंतर, जाण्या-येण्यासाठी दळणवळणाची सुविधा, तिथे होणारी गर्दी, प्रसाधनगृहाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. टीव्ही याबाबतीत बाजी मारतो. घरबसल्या बघायला मिळतं. जायची-यायची कटकट नाही, खड्डेभरल्या रस्त्यांतून प्रवास करायला नको. बरं मंच लांब आहे, गुरू दिसतच नाही असा मामलाही नाही. ४२ इंची स्क्रीनवर निवांतपणे अनुभवो शकतो आपण.

’      धर्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्‍स म्हणाले होते. लोकांनी सद्विचाराने जगावे यासाठी धर्माचे कोंदण असते. परंतु बदलत्या समीकरणांसह धर्माच्या आडून विखारी विचार पसरवण्याचेही प्रयत्न जगभरात सुरू आहेत. स्वत:च्या धर्माचा प्रसाराबरोबरीने दुसऱ्या धर्मविचाराला दूषणं देण्याचेही प्रकार उघड झाले आहेत. तूर्तास तरी भारतातल्या आध्यात्मिक वाहिन्या शांतपणे आपलं काम करत आहेत. मात्र  जगभरात दहशतवादाच्या प्रसारासाठी धर्माध व्यक्ती धर्माचा आडोसा घेत आहेत. अनिष्ट शक्ती वाहिनीच्या माध्यमातून समाजविरोधी विचार पसरवू शकतात.

’      एकीकडे जग टेक्नोसॅव्ही होतंय. ब्रॅण्डेड वस्तूंचा बोलबोला वाढतोय. कुठल्याही स्वरूपाचे अनुशासन नसलेले खुल्या स्वरूपाचे साहित्य, कार्यक्रमांची निर्मित्ती वाढते आहे. मांडणीपासून संगीतापर्यंत नवनवीन प्रयोग होत आहेत. मात्र त्याच वेळी जात ही ओळख आपण अधिक तीव्र करत आहोत. महिलांवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि त्याच वेळी आध्यात्मिक वाहिन्यांची लोकप्रियता टप्प्याटप्याने वाढतेच आहे. हे विरोधाभासी चित्र चकित करणारे आहे.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 23, 2016 1:25 am

Web Title: spiritual tv channels
Next Stories
1 नयी ‘जिंदगी’
2 अदला‘बदली’चा खेळ
3 कबड्डी झाली ग्लॅमरस!
Just Now!
X