सुख आणि दु:ख हे हातात हात घालून चालत असतात. सारे सदैव सुखी किंवा सारे सदैव दु:खी असे क्वचितच दिसते. उलट, दु:खाचे काही दिवस अनुभवल्यानंतर समोर येणाऱ्या सुखाचे समाधान अधिक सुखद असते. सुखाचे दिवस आनंदाने उपभोगायचे असतील, तर त्याआधी दु:खाचे चटके सोसले पाहिजेत. सध्या  ‘अच्छे दिनोंका’ बोलबाला असल्याने आणि तमाम देशवासीयांच्या नजरा त्या सुखाच्या दिवसांकडे लागलेल्या असल्याने, ज्यांच्या अपेक्षा उगीचच उंचावलेल्या असतात, त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे. दु:खाचे चटके सोसले की छोटेसे सुखदेखील मोठे समाधान देते. गेल्या तीन वर्षांत आपण या सार्वत्रिक सत्याच्या अनुभव घेतला. यातील पहिला अनुभव आता आठवणीतून पुसला गेला असेल. कारण, ‘पब्लिकची मेमरी’ भलतीच ‘शॉर्ट’ असते. आणि दु:खाचे दिवस शक्यतो लवकर विसरायचे असतात. अधूनमधूनच त्यांची आठवण काढावी, म्हणजे, सध्याचे दिवस भलतेच सुखाचे आहेत याची जाणीव होते, आणि माणूस सुखाच्या प्रत्यक्ष अनुभवाहूनही अधिक सुखावतो. याचा प्रत्यय यावा यासाठी साडेतीन वर्षे मागे जावे लागेल. तो दिवस होता, १६ मे २०१४ चा! सरकारच्या रेल्वे खात्याने अचानक एक परिपत्रक काढले.. कोणतीच पूर्वकल्पना नसताना, रेल्वेच्या भाडय़ात मोठी वाढ झाली. जुन्या दरांत आरक्षण करण्यासाठी काही मुदत ठेवून झालेल्या या दरवाढीमुळे, देशभरातील जनतेला दु:खाच्या दिवसांच्या कल्पनेने काहीसे भय वाटले आणि आपण त्यात सापडू नये यासाठी भराभरा जुन्या दरात रेल्वेची आरक्षणे सुरू झाली. उपनगरी रेल्वेच्या आगाऊ  मासिक, त्रमासिक पासांसाठी प्रचंड रांगा लागल्या, आणि रेल्वेच्या तिजोरीत अनपेक्षितपणे प्रचंड भर पडली. तब्बल पाच आठवडे रेल्वेची तिजोरी आगाऊ  खरेदीच्या गर्दीमुळे भरभरून वाहू लागली, आणि या चटक्यांनी त्रासलेल्या जनतेला २४ जूनला अचानक सरकारने सुखाचा धक्का दिला. रेल्वे भाडेवाढ रद्द झाली. याला काही जण ‘बनिया गेम’ म्हणतात. पाच आठवडे दु:खाचे चटके सोसल्याने, रद्द झालेल्या भाडेवाढीचे सुख एवढे मोठे होते, की अच्छे दिन आलेच, असेच साऱ्यांना वाटू लागले. ही तर अच्छे दिन या संकल्पनेची रंगीत तालीम होती. दु:खानंतर येणारे सुख अधिक सुखावणारे असते. चटका लागलाच, तर एखादी साधी फुंकरही बरी वाटू लागतेच. म्हणून चटक्याचा अनुभव घ्यायला हवा. आधी भाडेवाढ मग घूमजाव, तूरडाळ २०० ऐवजी १०० रु. किलो, अशा अनुभवांची संधी जनतेला देण्यात आली. चटक्यावर नुसती फुंकर मारल्यावर मिळणाऱ्या समाधानाची चटक लागली, की आधी चटके सोसायची तयारी असते- हे तर जगभरातील वास्तव आहे. पाच महिन्यांपूर्वीची जीएसटीची अंमलबजावणी आणि कालपासून लागू झालेल्या सुधारणेमुळे मिळणारा दिलासा यांच्याशी त्याचे साम्य आढळले, तर तो योगायोग समजावा.