रोजच्या बातम्यांनी पावसाची चाहूल देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्याच्या स्वागतासाठी उलटी गणती सुरू झालीदेखील आहे. तो केरळच्या किनाऱ्यावर थडकला, आता कोकणात दाखल होईल, आणि पाठोपाठ महाराष्ट्राचे आभाळ आपल्या पाऊसखुणांनी घनगर्दपणे व्यापून स्वतच आकाशात गडगडाटी नगारे वाजवत तो आपल्या आगमनाची चाहूल देईल. प्रतीक्षापूर्तीचा आनंद दाटेल, मने चिंब चिंब होऊन जातील.. हे असे नेहमीच होत असते. तसेच आताही होणार आहेच, पण त्या जाणिवांचा ओलावा हळूहळू कमी होणार अशा भीतीचे सावटही आसपास दाटू लागले आहे. कारण, आता त्या पाऊसखुणांना नवे, बदलांचे संदर्भही लाभले आहेत. पावसाच्या पाऊलखुणा न्याहाळताना, त्यांचा मागोवा घेताना, केवळ ‘कविता सुचतात’, घराघरांत नेहमीप्रमाणे ‘भजी, कांदापोहे आणि वाफाळल्या चहाची चव खुणावू लागते’ असे आता क्वचितच होते. मुंबईसारख्या महानगराच्या आभाळावर ढगांची दाटी झाली, विजांचा कडकडाट सुरू झाला, की भाळी काय लिहिले असेल या काळजीने मनामनांमध्ये भयाची शिरशिरी उठते. घराबाहेर असलेल्यांना घर गाठण्याची घाई होते; तर घराघरातल्यांची मने, घराबाहेर असलेल्यांच्या काळजीने काळवंडून जातात. एके काळी कधी तरी याच मनांमध्ये पावसाळ्याच्या चाहुलीसोबत कविताही बहरल्या होत्या. आता मात्र, या मनांवर काळजीची काजळी दाटते. यंदाच्या मान्सूनपूर्व हंगामातील पहिल्या पावसाचे ढग आकाशात दाटले तेव्हाही तसेच झाले.

एकाएकी विजांचा कडकडाट सुरू होतो, आणि धारांचा मारा शिरावर झेलत छपराच्या दिशेने प्रत्येकाची पळापळ सुरू होते. उपनगरी गाडय़ांची सिग्नल यंत्रणा कोलमडून जाते आणि बाहेर पाऊस कोसळत असतानाही, अंगावरच्या घामाच्या धारा झेलत गाडीतील गर्दी अशा वेळी द्यावयाच्या साऱ्या उद्धारकाव्यांची उजळणी करू लागते.. बाहेर रस्त्यावर वाहनांची अनाकलनीय कोंडी दाटू लागते.. सारी यंत्रणा थंडावते, आणि घडय़ाळाच्या काटय़ासोबत वेगाने धावणारे महानगर अजगरासारखे सुस्त होऊन जाते. ही एकटय़ा मुंबईचीच स्थिती नाही. विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक महानगरात याच महानगराच्या पहिल्या पावसाच्या चित्रास, ‘पूर्वमोसमी पाऊसखुणा’ हाच मथळा असतो.

याच महानगरांच्या सावलीत वाढणाऱ्या, शहरीपणाच्या खुणा मिरवणाऱ्या गावागावांची स्थिती अशीच असते. अचानक घरातली वीज गायब होते, पंखे, कूलर, वातानुकूलन यंत्रणा बंद पडते, तेव्हाच बाहेर पावसाळी ढगांची दाटी झाल्याची जाणीव होते. ही तर केवळ सुरुवात असते.. पुढच्या साऱ्या मोसमात आणखी काय काय पाहावे, सोसावे लागणार या काळजीची पहिली चुणूक या पूर्वमोसमी पाऊसखुणा देतात, आणि कवितांचा तो जुना बहर, कुठच्या कुठे हरवून जातो.. भज्यांची जागा काळजीने घेतलेली असते, आणि वाफाळत्या चहाचे दिवस तर आता सरलेलेच असतात.. अगदीच, एखाद्या निवांत दिवशी, पावसाचे ‘सेलिब्रेशन’ करायचे कुणी ठरवलेच, तर, चहाच्या कपाची जागा प्याले घेतात, आणि रात्र डोक्यात चढते.. अशा तऱ्हेने, पाऊसखुणांचे भय दूर करण्याचा आभासी आनंद उपभोगला जातो.