अरे डासांनो, कशाला त्या मामाजींना चावायला गेलात? ज्या राज्यात वावरता, जिथले खाता (नाही, पिता) तिथल्या मुख्यमंत्र्यांना ओळखता येत नाही तुम्हाला? गेली ना बिचाऱ्याएका अभियंत्याची नोकरी. तेही देशात नोकऱ्यांची मारामार असताना! हे मान्य की मानव हाच तुमचा अन्नपुरवठादार आहे. त्याच्या रक्तावर तुमचे पोट भरते. पण ते करताना समोरचा कोण हे बघायला नको का तुम्ही? अरे, गेले ते दिवस. सारे मानव समान असल्याचे. गेल्या ७० वर्षात अनेकांनी विशेषाधिकार पदरात पाडून घेतलाय.  तुमचा आवाज हेच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असली अधिकाराची भाषा विसरा. इथे माणसाचेच स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असताना तुमची पर्वा कुणी का करायची? मामाजींची झोपमोड म्हणजे काय साधा गुन्हा वाटला की काय तुम्हाला? तुमचा गूंऽगूऽचा स्वर सामूहिक करण्यासाठी तुम्ही टूलकीटचा आधार तर घेतला नाही ना? तसे असेल तर मग तो देशद्रोहच समजा. काय, स्वच्छता मोहीम तुमच्या मुळावर आली? तुमचे अधिवास संपू लागले? मग त्यात या मामाजींचा काय दोष? बदलाच घ्यायचा आहे तर जा ना दिल्लीत, लोककल्याण मार्गावर! मामाजी येणार म्हणून  त्या सरकारी बाबूने किती रंगरंगोटी केली. त्या वासाला भिऊन तुम्ही पळाल म्हणून बिचाºयाने घरची मच्छरदाणी आणली नाही. माणसांच्या संगतीत राहून तुम्हाला सर्व प्रकारच्या वासाची सवय झाली आहे हे त्याला तरी कुठे ठाऊक? तसेही आजकाल तुम्ही कोणत्याच औषधांना जुमानत नाही. शेवटी हातच चालवावा लागतो! आता दिवसाला १८ तास काम करणारा माणूस झोप सोडून काय तुम्हाला मारत बसणार आहे का? योग्य वेळी आराम मिळाला नाही तर राज्य कसे चालवणार ते? अधिकाऱ्यांनी हातांची पालखी केली, असे आमचे मामाजी! त्यामुळे यापुढे पोट भरायचे असेल तर माणसांमधले वरिष्ठ, कनिष्ठ ओळखायला शिका जरा. अशी वर्गवारी मानवाने कधीचीच आत्मसात केली आहे. तुम्हीही त्या दिशेने प्रयत्न करा. या देशात तुम्ही गरिबांचा रोज चावा घेतला तरी तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही. श्रीमंत व नेत्यांच्या बाबतीत जरा स्वत:ला आवरा.  तुम्ही मूळचेच रक्तपिपासू म्हणून काय झाले? इतका चिवटपणा नाही रे चांगला! कुणी थोरामोठ्यांनी हाकलले तर चटकन दूर व्हायचे. दुसरे भक्ष्य शोधायचे. उगीच परत परत मागे लागता? माणसांचीही सहनशक्ती कमी होत चाललीय अलीकडे. नेत्यांची तर त्याहून अधिक! जगा आणि जगू द्या या तत्त्वाचा विचार करा जरा. काय? तुमच्याही काही मागण्या आहेत व त्या मांडायच्या आहेत? नाही नाही अजिबात सांगू नका. २०२४ पर्यंत वेळच नाही आमच्या नेतृत्वाकडे. आधी माणसांना वठणीवर आणू द्या, मग तुमचे बघू.

तोवर, व्यवस्थेत स्वत:ची जागा निर्माण करुन टिकायचे असेल तर संयम बाळगायला शिका. दिसली फट की शीर आत हे बंद करा. अन्यथा तुमच्यामुळे माणसांचे बळी जात राहतील व तुम्ही रोषाला पात्र ठराल. मध्यप्रदेशच्या त्या निलंबित बाबूकडे लक्ष द्या जरा. उद्यापरवा आमचा नानाही जाणार आहे त्याच्या भेटीला… त्याच्या नव्या सिनेमात त्याने एक वाक्य टाकायला सांगितले आहे म्हणे! ‘एक मच्छर आदमी को बेरोजगार बना देता है’ असे. किमान त्याचा तरी मान राखा आणि व्हा शहाणे आता. चिलूट कुठले!