‘विचार शुद्ध असले की विकारांवर विजय मिळविता येतो आणि सकारात्मक विचारांमुळे मनाचे पोषण होते..’ मागे कधी तरी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या ‘विचार-मंच’ समूहावर सुप्रभात संदेशाद्वारे वाचलेला हा सुविचार आज वर्तमानपत्र वाचताना चिंतूला पुन्हा आठवला आणि त्या वेळी झपाटय़ाने सोशल मीडियावर पसरलेल्या एका सुंदर छायाचित्राभोवती त्याचे मन पुन्हा रुंजी घालू लागले. ते छायाचित्र पाहून चिंतू भारावला होता. एका निळ्याशार, अनाघ्रात, सुंदर अशा समुद्रकिनाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सनी लिओनी आपली सौंदर्यसंपदा उधळत असतानाही, छायाचित्रातील त्या समुद्राच्याच सौंदर्याची आपल्याला भुरळ पडली होती, ते त्याला आठवले. ‘असे सुंदर समुद्रकिनारे आपल्याकडे कधी दिसणार’, या त्याच्या सरळ, साध्या प्रश्नावरही तेव्हा मित्रांनी जोरदार खिल्ली उडविली, तेव्हा ‘आपले काही चुकले का’ या शंकेने चिंतू उगीचच चिंतातुर झाला होता. आपल्याला सौंदर्याची पारखच नाही, असेही मित्रांनी चिडविले होते तेदेखील त्याला आठवले. तेव्हापासून चिंतूचे मन समुद्रकिनाऱ्यांवरील सौंदर्याच्या शोधात वणवण भटकत होते. हातात वर्तमानपत्राची घडी धरून बाल्कनीतल्या खुर्चीत बसलेला असतानाही चिंतूचे मन मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोहोचले. काळेनिळे पाणी, कचऱ्याने भरलेले किनारे, भटकणारी टोळकी त्याला दिसू लागली आणि तो शहारला.. त्याचे मन तातडीने पुन्हा ताळ्यावर आले आणि चिंतूने पुन्हा ती बातमी वाचली. त्याला हायसे वाटले. तेव्हा आपले काहीच चुकले नव्हते, याची खात्रीदेखील त्याला पटली आणि घाईघाईने वर्तमानपत्राची घडी करून त्याने लॅपटॉप चालू केला. पुन्हा एकदा गुगल करून काही फोटो शोधले. ‘बेवॉच’ नावाच्या जगप्रसिद्ध चित्रवाणी मालिकेतील निळ्याशार समुद्राच्या पाश्र्वभूमीवरील काही चित्रांनी त्याला तेव्हाही वेड लावले होते. त्या मालिकेत दिसणारे, भुरळ घालणारे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आपल्याकडे दिसत नाहीच; पण आपल्याकडचे समुद्रकिनारे सुरक्षित कसे ठेवायचे हेही यांना कळत नाही, असेच तेव्हाही त्याला वाटले होते. आज चिंतूने पुन्हा काही फोटो निवडले आणि पूर्वीपासूनचे आपले परखड मत पुन्हा एकदा नमूद करून त्याने ते फोटो पुन्हा एकदा ग्रुपवर टाकले. काही सेकंदांतच त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. पुन्हा एकदा, चिंतूच्या सौंदर्यदृष्टीची खिल्ली उडविणारे विनोद मित्रांकडून सुरू झाले; पण या वेळी चिंतूचे मन अजिबातच विचलित झाले नाही. आपले विचार शुद्ध आहेत, याची त्याला खात्री होती. ‘बेवॉच’ नावाची ही मालिका पाहणाऱ्यांनी आपल्या नजरेने कधी या मालिकेकडे पाहिलेच नसावे या विचाराने तो काहीसा खंतावूनही गेला. एवढा शुद्ध, स्पष्ट आणि समाजहिताचा संदेश असलेल्या या मालिकेच्या प्रेक्षकांनी तो संदेश लक्षातच घेतला नसावा असे वाटून चिंतूला काहीसा रागदेखील आला. त्याने पुन्हा ती बातमी वाचली. न्यायालयानेच सरकारचे आणि मुंबईच्या महापालिकेतील अधिकाऱ्यांचे कान टोचले होते, याचा त्याला आनंद वाटला, पण दुसऱ्याच क्षणी चिंतू पुन्हा चिंतातुर झाला. ‘बेवॉच मालिका पाहिली नाही का,’ असे न्यायालयाने विचारल्याने, आता ती पाहावी लागेल असे समजून महापालिकेचे अधिकारी आणि सरकारचे संबंधित कर्मचारी पुन्हा ती मालिका पाहण्यात गुंतले आहेत आणि त्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा संदेश शोधण्याचाही त्यांना विसर पडला आहे, असे दृश्य चिंतूच्या मनाच्या पटलावर उमटू लागले. बेवॉच पाहण्यासाठी कामाचा काही वेळ खास राखून ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला तर.. या विचाराने चिंतूला पछाडले आणि तो डोके खाजवू लागला.. एवढे करून समुद्रकिनारे सुरक्षित आणि सुंदर कधी दिसणार, हा विचार त्याला छळू लागला आणि ‘सकारात्मक’ विचार करण्याचे ठरवून त्याने लॅपटॉप बंद करून टाकला.