20 January 2019

News Flash

नेतान्याहू यांच्या नोंदी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सपत्नीक व सव्यापारी व सउद्योजक भारतभेटीवर आले आहेत.

बिन्यामिन नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सपत्नीक व सव्यापारी व सउद्योजक भारतभेटीवर आले आहेत. या दौऱ्यातील विविध कार्यक्रमांत, भेटीगाठींमध्ये, झालेच तर रोड शो, पतंग उडविणे, भोजन आदी द्विपक्षीय सहकार्य व सौहार्दाच्या दृष्टीने व परस्परविश्वास वाढविण्याच्या हेतूने महत्त्वाच्या असलेल्या उपक्रमांत ते कमालीचे व्यग्र आहेत; पण या सर्व राजनैतिक व्यापातून वेळ काढून ते रोजच्या रोज दैनंदिनी लिहीतच असतात. अतिशय उद्बोधक अशा काही नोंदी त्यांनी या डायरीत केल्या आहेत. त्या भारतातील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना अतिशय उपयुक्त ठरू शकतील. उदाहरणार्थ ही नोंद पाहा – ‘काल दुपारी आग्र्यातील ताजमहाल पाहिला. इमारत जुनी व चांगली आहे. ती प्रेमाचे प्रतीक आहे. सकाळी तिकडे जाण्यापूर्वी साराबरोबर (पक्षी : श्री. नेतान्याहू यांच्या सुविद्य पत्नी) थोडा वाद झाला. तिला म्हणालो की, लाल रंगाचा वेश घालू नकोस. ते संकेतांस धरून होणार नाही. आपल्याबरोबर तिकडे योगी आदित्यनाथही असतील. त्यांच्या व तुझ्या वेशाचा रंग सारखाच होईल. ते बरे दिसणार नाही, पण तिने ऐकले नाही. तेथे गेल्यावर ताजमहालच्या बाकडय़ावर चढून दोघांना फोटो काढून घेण्याचा आग्रह योगी आदित्यनाथ यांनी धरला. म्हटले, या वयात आता कुठे असे फोटो काढायचे, तर ते म्हटले, तुमच्या आल्बममध्ये तसा फोटो नसेल, तर ताजमहाल पाहिल्याचे पुण्य लाभत नाही. शेवटी चढलो बाकडय़ावर. पण या भेटीत मजा आली नाही. कारण आमचे परममित्र नरेंद्रभाई आमच्याबरोबर नव्हते. सोबत मित्र नसला की अशा पर्यटनाला मजा येत नाही.’ यानंतरची दुसऱ्या पानावरील नोंदही अशीच आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आहे. ‘भारतातील पहिले जागतिक वारसा शहर पाहण्यास मिळणार म्हणून सारा खूप खूश होती. सतत विचारत होती, की कुठे आहे हे शहर? त्याची चौकशी करेपर्यंत आमचे विमान एका विमानतळावर उतरले. समोर बोर्ड होता – अहमदाबाद. एवढी शहरे पाहिली मी जगात, परंतु हे नाव एकाही शहराचे नाही. तेव्हा हे शहर जगात एकमेवाद्वितीय आहे, असे नरेंद्रभाई म्हणाले होते. हे शहर नरेंद्रभाईंनी वसविले आहे का, असे सारा विचारत होती. गुगलवर पाहून तिला नाही, असे सांगितले. स्वागताला खुद्द नरेंद्रभाई होते. त्यांनी मग आमची मिरवणूक काढली. अशी मिरवणूक आमच्या लग्नातही निघाली नव्हती. थँक्स नरेंद्रभाई. तुम्ही आमचे खरे मित्र आहात. तेथे पतंग उडवताना अगदी लहान मुलासारखे वाटले व नरेंदरभाई हे आपले लहानपणापासूनचे मित्र असल्यासारखे वाटले. ते स्वत: गांधीवादी असल्यामुळे त्यांनी आम्हांला गांधी आश्रमात नेले. तेथे खूप शांतता व स्वच्छता होती. आपल्याकडेही असे गांधी असते, तर स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मिटला असता, असे मनाला वाटले. मोदीजींनी तेथे आम्हांस चरखा चालवायला सांगितला. त्यावर सूत कातल्याने आम्हांला खूप आत्मिक समाधान वाटले, असे वाटले. त्या सर्व वातावरणाने मनावर फार प्रभाव पडला. वाटले की, जगातील सर्व प्रश्न शांततेने सुटू शकतात व पॅलेस्टिनी हे आपले बांधवच आहेत. नरेंद्रभाईंना तसे म्हणालो, तर ते गालातल्या गालात हसले. त्या वेळी तेही महात्माच वाटले..’

First Published on January 19, 2018 4:15 am

Web Title: benjamin netanyahu visit to india 2