गेल्या वर्षीची गोष्ट. तो प्रजासत्ताक दिन होता. दसरा नाही हे माहीत असूनही सारे सैनिक सकाळी उठले, आणि गोरेगावातील एनएसई मैदानावर जमले. त्यांचे प्राण कानात गोळा झाले होते. साहेब आज काही तरी जोरदार बाणा दाखविणार असे त्यांना वाटतच होते. तसेच झाले. साहेब मंचावर आले, नेहमीप्रमाणे गर्दीतून गजर झाला. ‘आवाज कुणाचा’ तेदेखील सगळ्यांना कळले, आणि साहेबांनी बोलावयास सुरुवात केली. ‘बस्स झाले आता. २५ वर्षे यांच्यासोबत राहून आम्ही सडलो. यापुढे त्यांच्याशी संगत नाही. कुणापुढेही झुकायचे नाही.. हा मी फेकला कटोरा’.. असे सांगून साहेबांनी जोशात हात हवेत भिरकावला. संकुलात टाळ्यांचा गजर! पुन्हा एकदा घोषणा घुमल्या. साऱ्या नजरा क्षणभर मागे वळल्या. जणू काही खरोखरीच त्या मंडपापासून एक कटोरा वेगाने बाहेर फेकला गेला होता, असे सर्वाना वाटले.. सगळ्यांनी मनाशी हुश्श म्हटले!

..आणि पुढे नवा खेळ सुरू झाला. मंडपातून वेगाने बाहेर पडलेला तो कटोरा थेट मलबार हिलवर येऊन पडला. साहेबांनी फेकलेल्या कटोऱ्याची वार्ता तोवर कानोकानी झाली होती. त्या कटोऱ्याचे महत्त्व माहीत असलेल्या एकाने चाणाक्षपणा दाखविला, आणि मलबार हिलवरच्या साहेबांच्या कानाशी लागून त्याने ‘कटोरा’मायणाचा अध्याय वाचून काढला. लगोलग आदेश गेले. मलबार हिलवर पडलेला तो कटोरा उचलून आणून सन्मानाने बंगल्यातील ‘सत्तासना’च्या मागे ठेवण्यात आला.. पुढे काही दिवस गेले. सारे वातावरणच बदलून गेले होते. ‘आता युती नकोच’ असे म्हणणारे सूर मवाळ होऊ लागले. गोरेगावातून साहेबांनी कटोरा फेकल्यापासून ते तर पुन्हा ढुंकूनही त्याकडे पाहणार नाहीत, हे इकडे ‘यांच्या’ लक्षात येऊ लागले होते. सत्तासनामागचा बिनकामाचा कटोरा यांना खुणावू लागला. या साहेबांचे हात सतत कटोऱ्याकडे जात होते, पण तो आपण उचलून त्यांच्यासमोर कसा धरायचा हा प्रश्नच होता. दिल्लीकरांना काय वाटेल ही भीती होतीच. अचानक चमत्कार झाला. दिल्लीतूनच आदेश आला, आणि या साहेबांनी कटोरा हाती धरला. सोबतच एक खणखणीत प्रतिज्ञाही केली. ‘कटोरा फक्त त्या साहेबांसमोरच धरेन. अन्य कोणासमोरही नाही!’.. दिल्लीकरांनी मान डोलावून संमती दिली, आणि कटोरा कामाला लागला. तिकडे दिल्लीतही, कटोऱ्याची महती पोहोचली होती. कसेही करून, कटोरा त्यांच्यासमोर धरलाच पाहिजे, असे ठरले. आता कटोरा पसरला म्हणजे प्रत्येक वेळी त्यामध्ये मनासारखे दान पडेलच असे नाही. काही वेळा झिडकारलेही जाईल. पण कटोरा सोडायचा नाही. अपमान झाला तरी सहन करायचा असे ठरले, आणि या साहेबांच्या हातीच्या कटोऱ्यात दान पडावे म्हणून आसपास युतीस्तोत्राचे सूर घुमू लागले. दादांनी आपला खास कोल्हापुरी सूर लावला. दिल्लीच्या भाऊंनीही त्यात आपला नागपुरी सूर मिसळला. दिल्लीतही त्या सुरांचे पडसाद सुरू झाले. सहन करण्याची क्षमता संपू देऊ नका, असा संदेश आला. विरोधाचे मुद्दे गुंडाळून ठेवा असेही बजावले गेले, आणि कटोरा पसरून केवळ युतीचेच गाणे गायचे असेही ठरले! ..गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे युती स्तोत्राचेच सूर घुमत आहेत. माहीमची खाडी ओलांडून ते सूर कलानगराच्या कोपऱ्यावर जाऊन आदळतील, तिथे त्याचे प्रतिध्वनी उमटतील, आणि अखेर ते असह्य़ होऊ लागले, की कंटाळून कटोऱ्यात हवे ते दान पडेल, अशा आशेवर आता इकडेतिकडे सगळीकडे युतीचे गाणे सुरू झाले आहे. त्यांनी फेकलेला कटोरा यांच्या कामाला आला, म्हणून सारे मनोमन त्यांचे आभार मानत आहेत. अशा रीतीने, नवे ‘कटोरा’मायण रंगात आले आहे!